त्वरित ऑक्सिजन बेडची सोय करावी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री आदिती तटकरे यांनी पुढाकार घेण्याची मागणी
उरण(घन:श्याम कडू) कोरोना कोविड १९ महामारीचे संकट उरणकरांवर घोंघावत आहे. अनेकांना या आजाराने ग्रासले आहे. त्यांच्यावर उपचार करणारी यंत्रणा अपुरी ठरत आहे. त्यामुळे बळींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. तरी उरणमधील करोडो रुपयांचा नफा कमविणाऱ्या कंपनीने पुढाकार घेऊन मदतीचा हातभार देऊन उपचार यंत्रणा सक्षम करावी जेणेकरून त्यामुळे उरणकरांचे कोरोना संकटातून जीव वाचण्यास मदत होईल. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री आदिती तटकरे यांनी पुढाकार घेऊन उरणकरांचे ऑक्सिजन अभावी जाणारे जीव वाचवावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.
देशात व राज्यात कोरोनारूपी महासंकट आले आहे. याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊन आता परिस्थिती गंभीर बनत चालली. त्यात बळींचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. उरणमध्ये ही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. दररोज पेशंट सापडू लागले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने दम लागणारे पेशंट जास्त आहेत. त्यांना ऑक्सिजनची नितांत गरज लागत आहे. परंतु याच गोष्टींची मोठी कमतरता जाणवत आहे. ही सोय सध्या तरी उरणमध्ये नसल्या कारणाने पेशंटला पनवेल, नवी मुंबई येथे हलवायला लागते. पनवेल, नवी मुंबईमध्येही हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी ऑक्सिजन बेडच खाली नाही. यामुळे उरणचा पेशंट ऑक्सिजन अभावी ताटकळत रहातो. त्यामध्ये त्याचा मृत्यू होण्याची शक्यता अधिक असते.
उरणमधील प्रकल्पग्रत शेतकऱ्यांच्या जमिनी सिडकोने कवडीमोल भावाने खरेदी करून त्यावर ओएनजीसी, बीपीसीएल, जेएनपीटी व इतर बंदरे, वायू विद्युत प्रकल्प उभे असून ते दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा नफा कमवित आहेत. मात्र येथील प्रकल्पग्रस्तांना देशोधडीला लावण्याचे काम केले आहे. आज हे प्रकल्प येऊन ३० ते ४० वर्षे होऊनही आजतागायत या भागातील जनतेसाठी सुसज्ज हॉस्पिटल सोडा साधे हॉस्पिटल उभारू शकले नाहीत. आज तर कोरोना विषाणूने देशात व राज्यात हाहाःकार माजवला आहे. उरणमध्ये याचे परिणाम जाणवू लागले आहेत. कोरोनच्या पेशंटला ऑक्सिजनची नितांत गरज लागत आहे. ती सेवा ही पनवेल व नवी मुंबईत आहे, परंतु त्या ठिकाणीही पेशंटच्या महामारीत बेडच शिल्लक नाही. त्यामुळे उरणमधील काही पेशंटना जीव गमवावा लागला आहे. तरी उरणमधील सदर कंपन्यांनी आपल्या नफ्यातील काही रक्कम खर्ची घालून उरणमध्ये ऑक्सिजन बेडची सोय करून देण्यास काहीच हरकत नाही. काही कंपन्यांनी संमती दर्शवली होती परंतु त्यांनतर कोणतीच हालचाल त्यांच्या कडून दिसत नाही.
संबंधित कंपन्यांनी आपला सीआरएस फंडचा वापर कोरोनाच्या महामारी संकटातून उरणकरांचे जीव वाचविण्यासाठी करण्यास हरकत नाही. त्यांनी उरणकरांचे सुसज्ज हॉस्पिटलचे स्वप्न पूर्ण होईल तेव्हा होईल, पण आता कोरोनावर उरणच्या पेशंटवर उपचार करण्यासाठी सुसज्ज उपचार यंत्रणा राबविण्यासाठी पुढाकार घेण्यास हरकत नाही. त्यांच्या येथे काम करणारा वर्ग हा उरणमधील स्थानिक जास्त आहे. त्यामुळे ही उपचार यंत्रणा राबविली नाही तर त्याचा विपरीत परिणाम येथील कंपन्यांवर होऊन कामकाज ठप्प होऊ शकते. याचा विचार येथील कंपनी प्रशासनाने जरूर करावा अशी उरणकरांची मागणी आहे.






Be First to Comment