सिटी बेल । पनवेल । वार्ताहर ।
कोरोना पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मद्यविक्री करण्यास बंदी असताना देखील छुप्या पध्दतीने मद्यविक्री करुन नियमभंग करणार्या खारघर मधील पापडीचा पाडा येथील साई एकविरा हॉटेलवर गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाने छापा मारुन हजारो रुपये किंमतीचा मद्याचा साठा जप्त केला आहे. तसेच बेकायदेशीररित्या मद्य विक्री केल्याप्रकरणी सदर हॉटेल चालकावर गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घेतले आहे.
कोरोना विषाणुंचे संक्रमण रोखण्यासाठी राज्य शासनाने लॉकडाऊन घोषित केला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता बार, पब्स, वाईन शॉप आणि इतर दुकाने बंद करण्याचे सक्त आदेश देण्यात आले आहेत. मात्र, त्यानंतर देखील खारघर मधील पापडीचा पाडा येथील साई एकविरा हॉटेल मधून बेकायदेशीररित्या देशीविदेशी मद्याची विक्री करण्यात येत असल्याची माहिती गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाला मिळाली होती.
त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने सदर हॉटेलवर छापा मारला असता, हॉटेलमध्ये देशी-विदेशी दारुचा साठा विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे आढळून आले. त्यामुळे गुन्हे शाखेने सदर हॉटेलमधून सुमारे 55 हजार रुपये किंमतीचा देशी-विदेशी मद्याचा साठा जप्त केला. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने सदर हॉटेलचा चालका विरोधात खारघर पोलीस ठाण्यात बेकायदेशीरीत्या दारुची विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.








Be First to Comment