अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेने आपली परंपरा कायम राखली : तलावात बुडालेल्या पर्यटकाचा मृतदेह शोधण्यात आले यश !
सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे ।
खालापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत चौक आऊट पोस्टच्या क्षेत्रात माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांच्या फार्महाऊसवर पर्यटनासाठी आलेल्या 9 पर्यटकापैकी एकजण पार्थ कोरा रा. मुलुंड – 25 हा पोहता येत नसल्याने आणि तळाचा अंदाज न आल्याने काल दुपारी 4 वाजताच्या सुमारास बुडाला होता. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, खोपोली नगरपालिकेच्या फायर ब्रिगेड टीमने काल रोजी मृतदेह शोधण्यासाठी सर्च ऑपरेशन केले होते मात्र त्यात यश मिळाले नाही.
खालापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल विभूते आणि चौकचे पोलीस उपनिरीक्षक बांगर साहेबांच्या मार्गदर्शना खाली आज सकाळी अपघाताचे मेंबर्सनी आज पहाटे 6 वाजता आंतरराष्ट्रीय स्कुबा डायव्हर दर्श अभानी याच्या नेतृत्वाखाली विजय भोसले, अभिजित घरत, अमोल कदम, राजेश पारठे, कार्तिक गोयल यांनी प्रत्यक्ष पाण्यात उतरून सर्च सुरू केले. गुरुनाथ साठेलकर, अक्षय आणि पूजा चांदूरकर (साठेलकर), भक्ती साठेलकर, अमित गुजरे यांनी मदतनीस म्हणून जबादारी पार पाडली. चार ते पाच प्रयत्नात पार्थ कोरा याचा खोल कपारीत अडकलेला मृतदेह बाहेर काढण्यात दर्शला यश आले.

पोलिस निरीक्षक अनिल विभूते आणि पोलीस उप निरीक्षक यांनी या कामगिरीबद्दल अपघातच्या टीमचे कौतुक केले आहे.
मृतदेह चौक पोलिसांच्या स्वाधीन केला असून चौकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात ठेवला असून पुढील कार्यवाही सुरु आहे. स्कुबा डायव्हिंगचे साहित्य याक एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून उपलब्ध झाले. खालापूरचे तहसीलदार इरेश चप्पलवार यांनी देखील अपघातच्या टीमच्या कामगिरीबद्दल कौतुक केले आहे.








Be First to Comment