
आरोग्य तपासणी करण्यास पॉझिटिव्ह रुग्णासह गावकऱ्यांचा विरोध
गावकऱ्यांच्या रोषापुढे प्रशासनाचा काढता पाय
सिटी बेल लाइव्ह / रायगड : (धनंजय कवठेकर )
अलिबाग तालुक्यातील बोडणी गाव हे कोरोनाचे हॉटस्पॉट झाले असून सद्यस्थितीत 72 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. बोडणी गावात पसरलेला कोरोना विषाणू नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य यंत्रणा, तहसीलदार, पोलीस प्रशासन प्रयत्न करण्यास गेले असता पॉझिटिव्ह असलेले रुग्ण तसेच शेकडो गावकऱ्यांनी गोंधळ घालून आलेल्या प्रशासनाला अक्षरश हाकलून लावले आहे. त्यामुळे बोडणी करांच्या या रुद्र अवतारापुढे प्रशासन हतबल होऊन अखेर त्यांना काढता पाय घ्यावा लागला आहे. मात्र या घटनेने गावात कोरोनाची संख्या वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अलिबाग तालुक्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. तालुक्यातील बोडणी गाव हे सध्या कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे. सद्यस्थितीत बोडणी गावात 72 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि स्थानिक प्रशासनाने बोडणी गावातील वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. तहसीलदार सचिन शेजाळ, मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धर्मराज सोनके आणि आरोग्य यंत्रणा, पोलीस कर्मचारी, ग्रामपंचायत प्रशासन यांनी गावात जाऊन गावातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. मात्र गावकऱ्यांनी त्याची ही मागणी धुडकावून लावली आहे.
बोडणीकरांच्या आरोग्य तपासणीसाठी गेलेल्या यंत्रणेने गावातील नागरिकांना कोरोना बाबत तपासणी करून घ्या अशी विनंती गावातील प्रमुख लोकांना केली. कोरोनामुळे बोडणी गाव हे कोरोना बाधीत क्षेत्र घोषित असून परिसर पूर्णतः बंदही केला आहे. गावात आढळलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांना नेण्यासाठी रुग्णवाहिकाही आणण्यात आली होती. पोलीस फोजफाटा ही तैनात करण्यात आला होता. मात्र बोडणी कर हे आक्रमक होऊन गावात लावलेल्या कंटेन्मेंट झोनचे बॅरिकेट तोडून शेकडो गावकरी प्रशासनाबरोबर हुज्जत घालू लागले. यामध्ये पॉझिटिव्ह असलेले बाधितही पुढे असल्याने पुन्हा एकदा बोडणी मध्ये कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गावकऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य न करता आलेल्या आरोग्य, महसूल, पोलीस प्रशासनाला अक्षरक्ष हाकलून लावले आहे. प्रशासनाकडून करीत असलेली तपासणी ही चुकीची असून मुद्दाम हुन आमचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह देत असल्याचा आरोप गावकरी करीत आहेत. बोडणीकरांनी केलेल्या उद्रेकामुळे प्रशासनाला काढता पाय घ्यावा लागला आहे. इतकेच नव्हे तर प्रशासनासोबत भांडण करून मुख्य रस्त्यावर शेकडो गावकरी धावत आले. गावात पिण्याचे पाणी घेऊन आलेल्या टँकरचे पाणीही गावकऱ्यांनी सोडून दिले आहे. गावकऱ्यांच्या या रोषापुढे प्रशासन हतबल होऊन निघून गेले आहे. गावकऱ्यांच्या या आडमुढे भूमिकेमुळे गावात कोरोनाचा मोठा उद्रेक होऊन त्याचे परिणाम हे अलिबाग करांना भोगावे लागणार हे मात्र नक्की.
बोडणी गावात कोरोनाचे रुग्ण वाढत असून संशयितांची तपासणी केली असून आतापर्यत 72 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी बोडणी करांनी सहकार्य करण्यासाठी यंत्रणा गावात आली असता पॉझिटिव्ह रुग्णासह गाववाले पोलीस, महसूल, आरोग्य यंत्रणेवर धावून आले. गावातील कोरोना प्रदूर्भाव नष्ट करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत मात्र गावकऱ्याकडून सहकार्य मिळत नाही.
सचिन शेजाळ, तहसलीदार, अलिबाग
भाजी, किराणा देण्याची गावकऱ्यांची मागणी
बोडणी हे गाव कोरोना बाधीत क्षेत्र जाहीर असून पूर्ण गाव बंद करण्यात आले आहे. मात्र कोरोना बाधीत क्षेत्र असतानाही याठिकाणी भाजीपाला, किराणा सामना व जीवनावश्यक वस्तू मिळत नसल्याची तक्रार या ग्रामस्थांची आहे.






Be First to Comment