Press "Enter" to skip to content

घटनास्थळी त्वरित भेट देत आमदार अनिकेतभाई तटकरेंची कार्यतत्परता

शॉर्ट सर्किटमुळे आग लागून नागोठण्यातील दुकानांचे लाखो रूपयांचे नुकसान

सिटी बेल । नागोठणे । शामकांत नेरपगार/ महेश पवार ।

नागोठणे एसटी स्थानका समोरील रायका बंधू यांच्या साईलक्ष्मी स्वीट अँड फरसान मार्ट या दुकानाला गुरूवारी(दि.२०) रात्री एक वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किट मुळे आग लागली. ही आग एवढी भयानक होती की रायका बंधू स्वीट मार्ट सह ६ दुकाने संपूर्णपणे जळून खाक झाली. तर इतर ३ दुकानांनाही आगीची झळ थोड्याफार प्रमाणात बसली. या आगीत एकत्रितपणे सुमारे ६५ ते ७० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिस व महसूल खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. तर दुकाने बंद केल्यानंतर रात्रीच्या वेळेस ही आग लागल्याने या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दरम्यान पूर असो, चक्रीवादळ असो वा रायगडसह कोकणात आलेली इतर कोणतीही आपत्ती असो, याबाबतीत घटनास्थळी पोहचत यंत्रणा राबवून आपल्या कार्य तत्परतेसाठी प्रसिद्ध असलेले कार्यतत्पर आमदार अनिकेतभाई तटकरे यांना या आगीची माहिती मिळताच त्यांनी त्वरित, सर्वांच्या आधी घटनास्थळी येऊन आगीतील नुकसानग्रस्त दुकानांची पाहणी केली. तसेच नुकसानग्रस्त सर्व व्यावसायिकांची जातीने विचारपूस करून नुकसानग्रस्त सर्व व्यावसायिकांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी सर्वोतपरी सहकार्य करण्याची हमी देऊन नुकसानग्रस्त व्यावसायिकांना दिलासा दिला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भाई टके, सदानंद गायकर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या आगीत महसूल खात्याकडून करण्यात आलेल्या पंचनाम्यानुसार नुकसानग्रस्त दुकानांमध्ये रायका बंधू यांच्या साईलक्ष्मी स्वीट अँड फरसान मार्ट (नुकसान रु. २७ लाख), ब्युटीफूल नाॅवेल्टी गिफ्ट सेंटर (१४ लाख) के. पी. हरिशकुमार याची बँगलोर अय्यंगर बेकरी (रु. १२,५००००), अजय साळुंखे यांचे अजय वाॅच हे घड्याळ दुकान (रु. ३,३२,०००), अनिल ठोंबरे यांचे प्रसाद इलेक्ट्रिक हे दुकान (रु. २ लाख), नरेश मोरे यांचे जनता सलून (रु, ५९,०००) व दिपक पवार यांचे सलून(रु. ७८,०००), अंकुश शिंदे यांचे जय भवानी ट्रेडर्स हे पत्रावळीचे दुकान (रु, २,९५०००), रश्मी राजेंद्र हाडकर यांचे महालक्ष्मी कलेक्शन कटलरी दुकान(रु.३,३०,०००) आदी नऊ दुकानांना या आगीचा फटका बसला.

नागोठण्यातील दुकानांना आग लागल्याची माहिती मिळताच रोहा उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सुर्यवंशी, नागोठणे पो. नि. दादासाहेब घुटुकडे, सहा.पो. नि. विजयकुमार देशमुख आदींसह पोलीस कर्मचारी रात्रीच तात्काळ घटनास्थळी पोहचले. त्यानंतर त्यांनी त्वरित नागोठण्याजवळील रिलायन्स, सुप्रिम, जेएसडब्ल्यू कंपनी तसेच रोहा एमआयडीसी यांचे अग्निशामक दलास पाचारण केले. या अग्निशामक दलांनी विशेष प्रयत्न करून आग आटोक्यात आणून विझवली. परंतु तो पर्यंत सर्व दुकाने आगीत जळून खाक झाली होती.

याबाबत रायका स्वीट मार्ट चे मालक किसन रायका यांनी नागोठणे पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर या घटनेची नागोठणे पोलिस ठाण्यात अकस्मात अग्नी अशी नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पो. नि. दादासाहेब घुटुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलीस करीत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.