सुधागडात एकाच दिवशी सापडले 4 पॉझिटिव्ह रुग्ण

सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे (धम्मशिल सावंत)
रायगड जिल्ह्यात दिवसागणिक कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढत आहे. अशातच सुधागड तालुक्यात देखील कोरोनाचा उद्रेक झाला आहे. बुधवारी (दि.22) एकाच दिवशी 4 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामध्ये परळी येथे 3 आणि पाली येथे 1 असे चार कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यामुळे सुधागड तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.
या 4 रुग्णांवर वावळोली येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू असून त्यांच्या संपर्कातील लोकांना होम कॉरेंटाईन करण्यात आले आहे अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शशिकांत मढवी यांनी दिली आहे.
सुधागड तालुक्यात कोरोना बधितांची संख्या 15 असून यातील 7 जण बरे होऊन घरी परतले आहेत. तर 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आणि 7 जणांवर उपचार सुरू आहेत. असे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शशिकांत मढवी यांनी सांगितले. तसेच कोणीही माहिती लपवू नये व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन डॉ. मढवी यांनी केले आहे.
सुधागड तालुक्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढत असल्याने तालुक्यातील नागरिकांनी आता तरी सतर्क राहून शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे, लॉक डाऊन मध्ये नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पाली तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी नागरिकांना केले आहे. दरम्यान संपूर्ण जिल्ह्यात लॉक डाऊन असताना पाली बाजारपेठेत व इतरत्र मात्र नागरिक नियम मोडीत बिनधोकपणे गर्दी करीत असल्याने कोरोनाचा संसर्ग अधिक फैलावण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.






Be First to Comment