चाणजे येथे वीज जोडणीचे काम करताना वीज कर्मचारी पोलावरून पडून जखमी
सिटी बेल । उरण । घन:श्याम कडू ।
वीज मंडळ विभागाचा कर्मचारी वर्ग अपुरा असल्याने ठेकेदारी पद्धतीने काम सुरू आहे. परंतु ज्या ठेकेदाराला काम मिळतो, तो कर्मचाऱ्यांना तुटपुंज्या पगारात खपवून कामासाठी कोणतीही सुरक्षा पुरवीत नसल्याचे समजते. त्यामुळे काल सायंकाळी एक कर्मचारी पोलवरून पडून जखमी झाल्याची माहिती चाणजे ग्रामपंचायत सदस्यांनी दिली.
चक्रीवादळाच्या तडाख्याने उरणमधील वीज यंत्रणा पुर्णपणे कोलमडून पडली होती. ती पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. तरीही काही ठिकाणी अजूनही प्रयत्न सुरू आहेत. रविवारी विद्युत पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे जनतेला अंधारात चाचपडत रहावे लागले होते. याला वीज मंडळच जबाबदार असल्याचे बोलले जाते. कारण मान्सूनपूर्व जी तयारी करायला हवी होती ती केली जात नसल्याचे दिसते.
वीज बिल थकीत असल्यावर जी धडक मोहीम निघते तशी मोहीम वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर दिसत नाही. वीज मंडळाचे कर्मचारी कमी असल्याकारणाने ठेकेदार पद्धतीने कामे करून घेतली जात आहेत. ठेकेदार कामाचा ठेका मिळाल्यानंतर अनुभवी कामगारांऐवजी अशिक्षित कामागार कमी पगारावर खपवून घेतले जात आहेत. त्याचबरोबर काम करीत असताना कामगारांना जी सुरक्षा पुरविणे आवश्यक असते ती पुरविली जात नसल्याने जीवावर उदार होऊन काम करावे लागत असल्याचे कामगार वर्ग सांगतात.
चाणजे ग्रामपंचायत परिसरात काल सायंकाळच्या सुमारास कामगार विद्युत पोलवर काम करत असताना पडून जखमी झाला.यावेळी अधिकारी वर्ग उपस्थित होते. सदर कामगाराला उरणमधील एका दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. याबाबत कोणतीही तक्रार नोंदविण्यात आल्याचे समजत नाही.
सदर प्रकरण परस्पर वीज मंडळाचे अधिकारी व ठेकेदार दडपण्यात यशस्वी झाल्याचे कामगार सांगतात. आम्ही बाहेरचे असल्याने आमची बाजू घेणारे कोणी नसल्याने आम्हांला काम करावे लागत असल्याचे हे कामगार सांगतात. अशा प्रकारची घटना घडल्याची कबुली चाणजे ग्रामपंचायत सदस्यांनी आमच्या प्रतिनिधीला दिली. तरी याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.








Be First to Comment