Press "Enter" to skip to content

उरणला तौक्ते चा तडाखा

सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस ; झाडांची पडझड, वीजपुरवठा खंडित

सिटी बेल । उरण । घन:श्याम कडू ।

अरबी समुद्रातून घोंघावत गुजरातच्या दिशेने निघालेल्या तौक्ते चक्रीवादळाचा फटका उरण तालुक्याला बसला. सोसाट्याचे वारे आणि मुसळधार पाऊस यांमुळे जनजीवन विस्कळीत झाले. उरण शहरात व तालुक्यात अनेक ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे अनेक घरांचे छप्पर उडून नुकसान झाल्याची माहिती आपत्कालीन विभागाने दिली.

सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शहरात व तालुक्यात अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. त्याचा फटका घरून कार्यालयीन कामे करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना बसला.उरणमध्ये पहाटे मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि हवेत गारवा निर्माण झाला. सोसाट्याचा वारा सुटल्याने शहरात व तालुक्यातील अनेक गावांत झाडे आणि झाडांच्या फांद्या पडण्याच्या घटना घडल्या. तसेच अनेक ठिकाणी विद्युत पोल पडल्याने वीज पुरवठा पुर्णपणे खंडित झाला होता.

शहरात व तालुक्यातील अनेक गावातील घरावरील पत्रे उडाली यामुळे घरातील सामानाची मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे रविवार पासून वीजपुरवठा खंडित झाल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. काल मंगळवारी रात्रीपासून वीजपुरवठा सुरळीत सुरू झाला आहे. परंतु पाऊस पाठ सोडताना दिसत नाही. त्यात कोरोनाचे सावट अशा दुहेरी संकटात नागरिक सापडले आहेत.झालेल्या आर्थिक नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत.

त्यामुळे उरणमध्ये नुकसानीचा निश्चित असा आकडा मिळालेला नाही. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसानीचा आकडा समजेल.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.