Press "Enter" to skip to content

विविध उपक्रम व प्रयोगांतून विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवीत आहेत ज्ञानगंगा 

रायगडात कोविडच्या संकटात विविध भूमिका समर्थपणे बजावत शिक्षकांचे नाविन्यपूर्ण शैक्षणिक कार्य सुरू

सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल सावंत)

कोविड-19 च्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी 16 मार्च पासून शाळा बंद झाल्या. त्यानंतर आता पुन्हा 15 जून पासून काही ठिकाणी ऑनलाइन शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र या सर्व कालखंडात देखील कोविड-19 ची विविध प्रकारची कामे व जबाबदाऱ्या सांभाळत अनेक शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ दिले नाही. अनेक शिक्षक विविध उपक्रम व प्रयोगांतून विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञानगंगा पोहचविण्याचे काम करत आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग उल्लेखनीय आहे. रायगड जिल्ह्यात अत्यंत प्रभावीपणे राबविलेल्या व यशस्वी ठरलेल्या या उपक्रमाचे, प्रयोगाचे  सर्वत्र कौतुक होत आहे.      

सुधागड तालुक्यातील राजीप शाळा नेनवलीचे उपशिक्षक राजेंद्र अंबिके यांनी कोविड-19 ग्रामपंचायत नियंत्रण कक्ष तसेच नांदगाव चेकपोस्ट ड्युटी सोबत नेणवली पालक मित्र ग्रुपद्वारे शाळा बंद शिक्षण सुरू अभ्यासमाला सुरू केली. तसेच LFW QUIZ सहभाग, ऍक्शन रिसर्च @20 या डाएट ग्रुपवरील चर्चेचे डिजिटल पुस्तकात रूपांतर करून फ्लिपबुक निर्मिती, सुधागड तालुका शिक्षकांसाठी प्रश्नमंजुषा निर्मिती, एससीइआरटी दीक्षा ऍपसाठी कार्यानुभव व्हिडिओ निर्मिती केली.

उरण तालुक्यातील रा. जि. प.शाळा रानवड चे उपशिक्षक रत्नाकर पाटील यांनी महाराष्ट्रतील काही मुलांना गुगल क्लासरूम च्या माध्यमातून शिक्षणरूपी वाघिणीच्या दुधाशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. इ.1 ली ते 5 वी चे 150 हून अधिक विद्यार्थी या ऑनलाईन टेस्टशी जोडले गेले व कोरोनाच्या वातावरणात असूनही मराठी, गणित व इंग्रजीचे टेस्ट पेपर मुले आज सोडवत आहेत.

 मुरुड तालुक्यातील चोरढे शाळेचे शिक्षक राजेंद्र नाईक यांनी 15 जून शैक्षणिक वर्ष सुरू पण शाळा बंद यासाठी शाळापूर्व तयारी अंतर्गत दर दिवशी एक विषय, त्यानुसार घटक निवडून 2 ते 4 पानांवर स्वाध्याय तो ही विचारप्रवर्तक, वैविध्यपूर्ण असा दर दिवशी फक्त 2 पाने असा अल्पखर्चीक ऑफलाइन स्वाध्याय देण्याचा उपक्रम सुरू केला आहे.

 श्रीवर्धन तालुक्यातील राजिप शाळा आरावी उर्दू चे शिक्षक समीर रब्बानी काजी सय्यद यांनी स्काईपच्या माध्यमातून बॅटल व्हर्सेस कोरोना (battle vs corona) या समूहाद्वारे अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

SCERT, पुणे मार्फत दैनिक अभ्यासमाला मध्ये योगदान दिले. http://www.bpegm.in ही website निर्मिती करून 4 लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविली. तालुकास्तरावर झूम ऍप च्या माध्यमातून शिक्षण सुरू ठेवण्यास तांत्रिक मदत केली. राज्यस्तरीय शैक्षणिक दिनदर्शिका उपक्रमात योगदान दिले.

कोरोना  जनजागृती, विद्यार्थी पालक यांना सोशल मिडीयाच्या माध्यमातून अनेक इ- साहित्य पाठविले, E – book नावाचे ऍप तयार केला त्यात इयत्ता पहिली ते 10 उर्दू माध्यमाच्या सर्व पुस्तकांचा समावेश आहे. दिक्षा ऍपसाठी विडिओ निर्मिती करणाऱ्या अनेक शिक्षकांना मार्गदर्शन करत आहेत.

   तळा तालुक्यातील बोरघर हवेली केंद्राने मुलांच्या ऑनलाइन शिक्षणासाठी वर्क फ्रॉम होम या कालावधीत ही मुलांचे शिक्षण बंद राहू नये म्हणून केंद्रातील शिक्षकांनी चक्क युट्युब चॅनेल बनविले आहे. तसेच मुलांना E-class नावाचे ई लर्निंग अँप ही सुरू केले आहे. या उपक्रमासाठी केंद्रप्रमुख संदीप जामकर यांनी सर्व शिक्षकांना व्हिडिओ निर्मिती करण्यासाठी मार्गदर्शन केले. 

    शहापूर च्या शिक्षिका प्रिती पवार यांनी कार्यानुभव संदर्भात प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई, कला व कार्यानुभव  शैक्षणिक दिक्षा अॅपसाठी कला व कार्यानुभवचे काही व्हिडिओ चित्रीकरण करून ते युट्युब चॅनलवर अपलोड केले. सफाळे येथील शिक्षक जतिन कदम यांनी 700 गोरगरीब कुटुंबांना विविध दानशूर व्यक्तींच्या मदतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. आरोग्य विभागाला कामात सहकार्य केले. कोरोनाबाबत मार्गदर्शन करत आहेत.  zpguru.in या website अंतर्गत राज्यभरातील विद्यार्थ्यांकरिता दररोज ऑनलाइन टेस्ट व व्हिडीओ बनविण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहेत. शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शक व्हिडीओ तयार केले. अशाच प्रकारचे काम गोवणे – डहाणू येथील पदवीधर शिक्षिका प्रतिभा क्षीरसागर-कदम यांनी देखील केले आहे.

    जिल्ह्यासह राज्यात अशा प्रकारे असंख्य शिक्षकांनी कोरोना जनजागृती, त्या संदर्भातील विविध कामे व जबाबदाऱ्या सांभाळत आपल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामगिरी उंचावण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. आणि ते यशस्वीपणे सुरू देखील आहेत. 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.