Press "Enter" to skip to content

चक्रीवाळात उरण पंचायत समितीचे कार्यालय आधी बंद : नंतर झाले सुरू

सिटी बेल । उरण । घन:श्याम कडू ।

रायगड जिल्ह्यात चक्रीवादळाची शक्यता असल्याने सर्व प्रशासन यंत्रणेला सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिले असतानाही उरणमधील कार्यतत्पर समजले जाणारे पंचायत समिती कार्यालयात कोणीही हजर नसून ते बंद असल्याने नागरिकांत नाराजीचा सूर असून याची चौकशी करून दोषीं अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे विचारणा केल्यावर व फोटो व्हायरल होताच उरण पंचायत समितीची यंत्रणा खडबडून जागी झाली.

रायगड जिल्हयाच्या किनारपट्टीवर दि. १६ व १७ मे २०२१ या कालावधीमध्ये चक्रीवादळ येत असल्याबाबत भारतीय हवामान खात्याने इशारा दिला आहे. या कालावधीत वाऱ्याचा वेग खूप जास्त असण्याचा तसेच मुसळधार पावसाचीही शक्यता आहे.

तरी ग्रामस्थांनी खालीलप्रमाणे काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्ष निधी चौधरी तसेच निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या सदस्य सचिव डॉ.पद्मश्री बैनाडे यांनी केले आहे.

त्याचबरोबर कोणत्याही आपत्तीस तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी सज्ज असून नागरिकांनी काळजी करू नये, प्रशासन देत असलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असेही आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
उरणमधील तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी वर्ग सज्ज आहेत. मात्र तालुक्यातील ग्रामपंचायतीचे हेडकॉर्टर समजले जाणारे कार्यतत्पर उरण पंचायत समितीचे कार्यालय बंद असून गेटही बंद आहेत. याबाबत गटविकास अधिकारी नीलम गाडे यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. तसेच अंजने यांच्याशी संपर्क साधला असता आम्ही ग्रामसेवकांना सतर्क रहाण्याचे आदेश दिल्याचे सांगितले. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी याची दखल घेऊन संबंधित सर्व अधिकारी वर्गाना त्वरित हजर रहाण्याचे आदेश दिले.

चक्रीवादळाचा फटका समद्र किनाऱ्यावरील गावांना बसला तर त्यांनी मदतीसाठी कोणाकडे धाव घ्यावयाची असा सवाल उपस्थित होत आहे. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी ज्या ज्या प्रशासनावर व अधिकारी वर्गावर याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी जनतेकडून जोर धरू लागली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.