सिटी बेल । उरण । घन:श्याम कडू ।
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी शासनाकडून लसीकरण मोहीम सुरू आहे.उरणमध्ये ही ३ ठिकाणी लसीकरण सुरू आहे. परंतु त्यातील उरण शहरातील लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी लावण्यात येणाऱ्या रांगेत टोकन वाटपाचा गेले अनेक दिवसांपासून काळाबाजार होत आहे. जे खरोखरच रांगेत मध्यरात्रीपासून उभे रहातात त्यांना टोकन न मिळता एसी झोपून येणाऱ्यां मिळत असल्याने जनतेत नाराजींचा सूर आहे. याला वेळीच आळा घातला नाही तर जनतेच्या भावनांचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी एकतर लसीकरणाची संख्या वाढवावी अन्यथा दुसऱ्या दिवसांचे टोकन हे संध्याकाळीच देण्यात यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.
उरणमध्ये शहरात नगरपालिका शाळा, कोप्रोली व जेएनपीटी वसाहत असे ३ लसीकरण केंद्र आहेत. प्रत्येक लसीकरण केंद्रावर फक्त १०० डोस देण्यात येतात.परंतु त्यामध्येही पहिला डोस ३० तर दुसरा डोस ७० जणांना अशी विभागणी झालेली आहे. डोस घेण्यासाठी नागरिक रात्री १२ वाजल्यापासून रांगेत उभे असतात तरीही त्यांचा नंबर लागला नसल्याचे समजते. एक महिला पहाटे ४ वाजता व आज मध्यरात्री १.३० वाजता येऊनही त्यांना टोकन मिळाले नाही. मग टोकन जातात कुठे असा सवाल उपस्थित होतो.
एखादा हिट सिनेमा असल्यानंतर ज्याप्रमाणे तिकिटांचा काळाबाजार होतो त्याप्रमाणे लस टोकनचा काळाबाजार होत असल्याची ओरड रांगेत राहणाऱ्या नागरिकांकडून होत आहे. मध्यरात्रीपासून टोकन मिळविण्यासाठी उभे राहणाऱ्या एखाद्याचे बरेवाईट झालेतर त्याची जबाबदारी कोण घेईल असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.
लस घेताना नाष्टा करणे महत्त्वाचे असतानाही रात्रभर रांगेत उभे राहून दुपारी लस घेताना त्यांची हालत काय होत असेल. याचा सारासार विचार प्रशासनाने करून एकत्र डोस ची संख्या वाढवावी अन्यथा दुसऱ्या दिवसांचे टोकन हे संध्याकाळी वाटण्यात यावे जेणेकरून टोकनसाठी तरी नागरिकांना ताटकळत उभे रहावे लागणार नाही. तसेच टोकनचा काळाबाजार करणाऱ्या टोळीवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.








Be First to Comment