आरोपीला सात दिवसांची पोलिस कोठडी
सिटी बेल । नागोठणे । महेश पवार ।
मुलगी अल्पवयीन आहे हे माहित असूनही तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ज्ञानेश्वर धावजी ठाकूर (वय.३५) रा. चोळे, मूळ रा. दादर, ता. पेण या आरोपीवर बालकांचे लैंगिक अत्याचारा पासून संरक्षण कायदा २०१२ चे कलम ४ व ६, भा.दं.वि. संहितेच्या कलम ३७६ व अन्य कलमाखाली नागोठणे पोलिस ठाण्यात ६ मे, २०२१ रोजी दुपारी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
नागोठणे पोलिसांकडून आरोपीस अटक करुन आज रोहा येथील फौजदारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाकडून आरोपीस १३ मे पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
यासंदर्भात नागोठणे पोलिस ठाण्यातून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार १३ वर्ष वय असलेल्या नागोठण्याजवळील चोळे (ता.पेण) येथील अल्पवयीन मुलीशी ती अल्पवयीन आहे हे माहीत असूनही आरोपी ज्ञानेश्वर ठाकूर याने तिच्याशी प्रेमसंबध ठेवले. तसेच तिला लग्नाचे खोटे आश्वासन देऊन तिच्याशी शिहू व दादर कडप्पे येथे २१ एप्रिल, २०२१ ते ६ मे, २०२१ दरम्यान शारीरिक संबंध ठेवले. नंतर त्या मुलीस आरोपीने फूस लावून पळवून नेल्याने सदर मुलीच्या काकीच्या तक्रारी वरुन पाली येथील महिला सहाय्यक पोलिस निरिक्षक तृप्ती बोराटे यांच्याकडून सदर गुन्ह्याची तक्रार घेण्यात आली.
या गुन्ह्यातील आरोपीस त्याच्या दादर येथील मूळ गावातून गुरूवारी (दि.६) सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आले. आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या नागोठणे पोलिस ठाण्याच्या पथकात सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक मोहन म्हात्रे, पोलिस हवालदार जितेंद्र चव्हान, पोलिस नाईक नितीन गायकवाड व पो.शिपाई रामनाथ ठाकूर यांचा समावेश होता.
या गुन्ह्याची माहिती मिळताच रोहाचे उपविभागीय पोलिस अधिकारी किरणकुमार सुर्यवंशी यांनी नागोठणे पोलिस ठाण्यात गुरूवारी सायंकाळी भेट देऊन सदर गुन्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. याप्रकरणी नागोठण्याचे पोलिस निरिक्षक दादासाहेब घुटुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. विजयकुमार देशमुख हे पुढील तपास करीत आहेत.








Be First to Comment