सिडको कार्यालयानजीकचा पीडब्ल्यूडीचा पूल धोकादायक असल्याचे बोर्ड लावून केवळ बोर्डा पुरती अवजड वाहतूक केली बंद
सिटी बेल । उरण । अजित पाटील ।
कुणीतरी मेल्यावरच किंवा कोणता तरी अपघात झाल्यावरच प्रशासनाला जाग येत असल्याचे उरणमध्ये पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे . उरणच्या फुंडे गावानजीकचा सिडकोचा पूल पत्त्यासारखा कोसळून त्यावरून प्रवास करणाऱ्या एकाचा मृत्यू झाला होता . ते प्रकरण घडून गेल्यावर आता उरणचे सार्वजनिक बांधकाम खाते जागे झाले असून उरण पनवेल रस्त्या वरील फुंडे फाटा येथील आणखी एक पूल कमकुवत झाला असून त्यावरून अवजड वाहतूक करण्यात येऊ नये असा फलक केवळ औपचारिकता म्हणून सार्वजनिक बांधकाम खात्याने त्या पुलांनजीक लावला आहे.
मात्र उरण शहराकडे जाणारी सर्व अवजड वाहतूक त्या बोर्डाला ललकारत याच मार्गावरून सुरू असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे त्यामध्ये एस टी बस सह , मालाच्या मोठ मोठ्या गाड्या , बी पी सी एल कडे जाणारे सिलेंडर ट्रक आदी याच मार्गावरून जात आहेत. त्यामुळे पी डब्ल्यू डी च्या अधिकारी वर्गाने केवळ औपचारीकता म्हणूनच तर हे बोर्ड लावले नाही ना असा प्रश्न या ठिकाणी विचारला जात आहे .
उरणच्या फुंडे गावाजवळ असलेला सिडकोचा जुनाट पूल कोसळून दादारपाडा गावच्या दिपक कासुकर नावाच्या युवकाचा हकनाक बळी काही दिवसांपूर्वी गेला . हा बळी जाईपर्यंत ना सिडकोच्या अधिकारी वर्गाला हा पूल कमकुवत आहे याचा साक्षात्कार झाला ना त्याचं स्ट्रक्चरल ऑडीट करण्याची बुद्धी झाली . प्रशासकीय अधिकारी वर्गाच्या याच बेफिकीरीने दिपकचा बळी गेला. हा बळी गेल्यावर उरणमधील अनेक पुलांच्या दुरवस्थे बद्दल चर्चा रंगल्या. त्यामध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीतील अनेक पुलांचा समावेश आहे.
खोपटा खाडीवरील जुना पुल हा केवळ कागदोपत्री अवजड वाहतुकीसाठी सक्षम नसलेल्या पुलावरून आजही परिसरातील गोदामांमध्ये अवजड वाहतूक बेधडक पणे होत आहे! त्यामुळे भविष्यात या पुलाचा सावित्री पुलासारखा प्रकार झाल्यास आश्वर्य वाटायला नको अशा चर्चा अनेक सोशल मीडियातून झाल्या! आणि बघता बघता सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांच्या बुद्धीला काही तरी करा या बाबत मन “वळवी “न्यात याच चर्चा कारणीभूत ठरल्या ! आता त्यांनी फुंडे येथीलच सिडको कार्यालयाजवळील आपल्या अखत्यारीतील पूल कमकुवत असल्याचा साक्षात्कार झाल्यागत या पुलाशेजारील खांबाला पूल कमकुवत असल्याबाबतचा बोर्ड लावला आहे.
गमतीचा भाग म्हणजे हा बोर्ड केवळ नावापुरताच लावला असून आजही एस टी सह बहुतांशी अवजड वाहने याच मार्गावरून मार्गस्थ होत आहेत ! ही वाहने याच मार्गावरून मार्गस्थ होतांना त्या बोर्डाला जणू डिवचले जात असल्याचे दिसून येत आहे . सार्वजनिक बांधकाम खात्याचे काम आणि जरा थांब असं बोलायची वेळ आली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्त्याला खेटून कोटनाका भागात अनेक अनधिकृत बांधकामे गटारावर स्लॅब टाकून उभी राहत आहेत मात्र सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी आपल्याकडे कोणाची याबाबत तक्रार नसल्याची टिमकी वाजवून ती बांधकामे वाचवत तर नाहीत ना ? असा प्रश्न या ठिकाणी विचारला जात आहे.
विशेष म्हणजे याबाबत उरणच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकारी वर्गाकडे विचारणा केली असता त्यांनी काहीही न बोलण पसंत केल्याचे समोर आले आहे! एकूणच उरणच्या सार्वजनिक बांधकाम खात्याला जागे करणारी नजर वरिष्ठ कधी “वळवी”तील असा सवाल या ठिकाणी विचारला जात आहे .








Be First to Comment