घारापुरी बेटावरील शेतबंदर, राजबंदर, मोराबंदर गावांत मोफत रेशन वाटप
सिटी बेल । उरण । विठ्ठल ममताबादे ।
समाजकार्यात अग्रणी असणाऱ्या पार्थ पवार फाऊंडेशन या संस्थेने मुंबईनजीक असणाऱ्या आणि अरबी समुद्रात स्थित उरण तालुक्यातील घारापुरी (एलिफंटा) या बेटावर वसलेल्या गावांना कुठलाही मोबदला न घेता जीवनावश्यक बाबी उपलब्ध करून दिल्या.
कोरोना महामारीने संपूर्ण जगाला हादरवून सोडले असताना सध्या भारतात या विषाणूने हाहाकार माजवला आहे. शहर-शहर, गाव-गाव कोरोनाच्या विळख्यात सापडल्याने मुख्यतः उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न गोरगरिबांना भेडसावत आहे. यातील गांभीर्यता लक्षात घेत संस्थेने बेटावरील तब्बल २०० कुटुंबांना मोफत राशन वाटप केले. यामुळे कुटुंबांच्या पोटापाण्याचा प्रश्न मार्गी लागल्याने गावकरी सुखावले आहेत.
उरण तालुक्यातील घारापुरी हे बेट सुप्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. पर्यटकांना बेटावरील प्राचीन लेण्यांची माहिती देणे, विविध आकर्षक वस्तूंची विक्री करणे, रुचकर पदार्थ देशी-विदेशी पर्यटकांना खाऊ घालणे इथल्या स्थानिकांचा प्रमुख व्यवसाय आहे. मात्र कोरोनाचा कहर तुटून पडला आणि या बेटावरील गावकऱ्यांचा व्यवसाय ठप्प झाला. परिणामी, आर्थिक उत्पन्नाचा मार्ग बंद झाला. त्यानंतर आर्थिक चणचण व दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या चिंताग्रस्त ग्रामस्थांना उदरनिर्वाहाचा भीषण प्रश्न सतावत होता. मात्र पार्थ पवार फाऊंडेशनने वेळेत धाव घेत घारापुरी बेटावर वसलेल्या शेतबंदर, राजबंदर आणि मोराबंदर या गावांत जाऊन त्याठिकाणी मोफत राशन वाटपाचा उपक्रम राबवला. गावांतील २०० कुटुंबांना अन्नधान्य व अन्य जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करीत उदरनिर्वाहाची अडचण संस्थेने दूर केली.
Be First to Comment