नाक्यावर बैलाला इंजेक्शन मारून केले बेशुद्ध : ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे चोरटे रिक्त हाताने पसार
सिटी बेल । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।
सुतारवाडी परिसरात बैल चोरणारी टोळी अनेक दिवसापासून कार्यरतl असुन काल सुतारवाडी नाक्यावर एका बैलाला अज्ञात चोरट्यांनी भूलीचा इंजेक्शन मारून बेशुद्ध केले. मात्र ग्रामस्थांच्या प्रसंगावधाना मुळे चोरटे रिक्त हाताने पळून गेले असून बैल मात्र अद्यापही बेशुद्धावस्थेत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की सुतारवाडी नाक्यावर दिनांक १ मे २०२१ रोजी रात्री अडीचच्या सुमारास एक स्विफ्ट गाडी थांबली. या गाडीतील दोघे जण खाली उतरून तिथे विश्रांती घेत असलेल्या बैलाला पळविण्याच्या उद्देशाने भूलीचा इंजेक्शन दिल्याने तो बैल बेशुद्ध झाला. मात्र येथील ग्रामस्थ मनोहर साळवी आणि शंकर चव्हाण यांना जाग आल्यानंतर नाक्यावर कसला आवाज येतो हे पाहण्यासाठी जात असताना मारुती स्विफ्ट मधून खाली उतरलेले अज्ञात व्यक्ती त्वरित गाडीत बसून त्यांनी पलायन केल्याने किमती बैल बचावले. ते बैल बेशुद्ध अवस्थेत सुतारवाडी नाक्यावर असून हा बैल जामगाव येथील शेतकरी आनंद जांभळे यांचा असल्याचे मनोहर साळवी यांनी सांगितले.
तसेच साळवी यांनी पुढे शेतकऱ्यांना सावधान तेचा इशारा देताना सांगितले की शेतकरी बांधवांनी आपली किमती जनावरे बाहेर मोकाट सोडू नये. गेल्या वर्षी गुर चोरणारी टोळी सक्रिय होती. कुडली तसेच अन्य भागातील अनेक गुर चोरीला गेली होती. अशी टोळी मोकाट गुरांना भुलीचे इंजेक्शन देऊन त्यांना बेशुद्ध करतात ते बेशुद्ध झाले की त्यांना ट्रक किंवा टेम्पोमध्ये भरून विक्रीसाठी नेत असतात. त्यामुळे गरीब शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते.
पुढील महिन्यात पावसाळा सुरू होणार असून शेतकऱ्यांना गुरांची आवश्यकता असते. अशा अवस्थेत चोरांनी गुर पळून नेली तर शेतकर्याला मोठा भुर्दंड बसेल त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली गुरे मोकाट सोडू नयेत असे मनोहर साळवी यांनी सांगितले.








Be First to Comment