सिटी बेल । उरण । घन:श्याम कडू ।
उरण तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे लसीकरण सुरू आहे. परंतु लोकसंख्या पहाता लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी तालुक्यात लस व लसीकरण केंद्र वाढविण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. यासंदर्भात उरण तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
उरण तालुक्यात कोविड १९ रोगाचे निर्मूलन करण्याकरिता उरण,कोप्रोली व जेएनपीटी येथे फक्त 3 लसीकरण केंद्र आहेत पण तिथेही येणाऱ्या लसी ह्या अपुऱ्या आहेत. त्यामुळे ह्या तिन्ही केंद्रावर नागरिकांची गर्दी होत आहे. त्यातच सरकारने १ मे पासून १८ वर्षा वरील नागरिकांना देखील लस देण्याचे आदेश दिले आहेत. त्यावेळी हे ३ लसीकरण केंद्र व अपुऱ्या लसी ह्या मुळे होणारी गर्दी आवाक्या बाहेर असेल. त्या गर्दीमुळे कोरोना संसर्गात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
याकडे लक्ष देऊन उरण तालुक्या करीता शासनाकडे जास्त लसीची मागणी करावी व तालुक्यातील अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र करावे किंवा फिरते लसीकरण केंद्र उभारावा अशी विनंती ह्या निवेदना द्वारे मनसेने केली आहे. यामुळे लसीकरणाच्या ठिकाणी गर्दी कमी होऊन उरणमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल असा विश्वास वाटत आहे.
मनसे नाविक सेनेचे राज्य उपाध्यक्ष संदेश ठाकूर व राज्य चिटणीस सत्यवान भगत यांनी याबाबतचे निवेदन निवासी नायब तहसीलदार संदीप खोमणे यांना दिले .








Be First to Comment