सिटी बेल । उरण । घनःश्याम कडू ।
राज्यात कोरोना महामारीचे संकट आले आहे. या विळख्यात अनेकजण अडकून त्यातील काहींना जीवाला मुकावे लागले आहे. शासन कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करीत असताना अनेक ठिकाणचे स्थानिक प्रशासनाने सर्वसामान्य ग्रामपंचायत कर्मचार्यांची सुरक्षितता वार्यावर सोडल्यात जमा आहे. त्यांना कोरोना मयताचे दहन करताना कोणतेही सुरक्षा कवच दिले जात नसल्याची धक्कादायक माहिती ग्रामपंचायत कर्मचार्यांनी दिली.
आजच्या धकाधकीच्या काळात कोरोनाच्या संकटाचा सामना आम जनतेला करावा लागत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. तरीही कोरोनाचे संकट कमी होण्याऐवजी वाढतच चालले आहे. या लढाईत अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहे. पूर्वी कोरोनाने मयत झालेल्यांचे शासकीय पध्दतीने अंत्यसंस्कार केले जात होते. परंतु आता कोरोना मयताची बॉडी संबंधित ग्रामपंचायतीच्या सरपंचाला सांगून नातेवाईकांकडे सुपूर्द केली जात आहे. यामुळेही कोरोनाचा प्रार्दभाव वाढण्याची शक्यता आहे.
उरणमधील काही ग्रामपंचायत हद्दीतील कोरोना मयतांवर गावातच अंत्यसंस्कार करण्यात आले. ही जबाबदारी ग्रामपंचायत कर्मचार्यांवर टाकण्यात आली होती. परंतु ही कामगिरी करणार्या ग्रामपंचायत कर्मचार्यांना कोणतीही सुरक्षित साधने देण्यात आलेली नाही. कोरोना मयतावर अंत्यसंस्कार करत असणार्यांनी पिपिकीट, हॅन्डग्लोज, मास्क व सॅनिटायझर आदी साहित्य वापरून विधी करणे बंधनकारक असतानाही यातील कोणतीही साधने ग्रामपंचायत कर्मचार्यांना देण्यात आलेली नाही.
ग्रामपंचायत कर्मचार्यांना कोरोना मयतावर अंत्यसंस्कार करताना कोणतीही सुरक्षा न मिळाल्याने जीवावर उदार होऊन काम करावे लागत आहे. अशा प्रकारे कोरोना मयतावर अंत्यसंस्कार करताना कोणा कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाली व त्यामध्ये सदर कर्मचार्यांचा मृत्यू झाला तर त्याची व त्याच्या कुटूंबाची जबाबदारी कोण घेईल असा सवाल यानिमित्ताने उभा रहात आहे. तरी जीवावर उदार होऊन काम करणार्या ग्रामपंचायत सदस्यांना सुरक्षतेची साधने शासनाने द्यावीत अशी मागणी ग्रामपंचायत कर्मचार्यांनी केली आहे.








Be First to Comment