सिटी बेल । उरण । घनःश्याम कडू ।
उरण तालुक्यातील नागाव पिरवाडी समुद्र किनार्यावरील मोकळ्या जागेवर अनधिकृत बांधकामे उभी रहात आहेत. याकडे प्रशासनाचे आर्थिक हित सबंधामुळे दुर्लक्ष केले जात असल्याचे बोलले जात आहे.
पिरवाडी समुद्र किनारा येथील नागरिकांसाठी पर्यटनस्थळ आहे. तसेच या किनार्या लगतच ओएनजीसी सारखा राष्ट्रीय तेल प्रकल्प कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे मांगीनदेवी व दर्गा आहे. त्याचे दर्शन घेण्यासाठी उरण, पनवेल, नवी मुंबई, मुबंईहुन भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या ठिकाणी येणार्या पर्यटक व भाविकांची गर्दी कमी झाली आहे. याचाच फायदा काहींनी उचलत समुद्र किनारी पक्की अनधिकृत बांधकामे काही दिवसांत उभी केली आहेत. मात्र ही बांधकामे उभी रहात असताना प्रशासन कोणतीच कारवाई करताना दिसत नाही. यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दहशतवादी कारवायासाठी समुद्र किनार्याचा वापर केला जात असल्याचे अनेकवेळा उघड झाले आहे. त्यामुळे भविष्यात अशा अनधिकृत बांधकामांचा वापर दहशतवादी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. या समुद्र किनार्याच्या अगदी जवळ ओएनजीसी सारखा राष्ट्रीय तेल प्रकल्प कार्यरत आहे. त्यामुळे आजूबाजूला अशा प्रकारे अनधिकृत बांधकामे उभी राहणे देशहितासाठी अत्यंत धोकादायक आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
काही महिन्यांपूर्वी अलिबाग येथील समुद्र किनारी असलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली होती. त्यामध्ये अनेक धनंदांडग्याची बांधकामे होती. मात्र उरणमधील समुद्र किनारी अनेक अनधिकृत बांधकामे उभी राहत असतानाही प्रशासन मठ्ठपणे बघ्याची भूमिका घेत असल्याने त्यांच्या विरोधात आम जनतेत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ओएनजीसी प्रकल्प तसेच दर्गा व मांगीन देवी ही भक्तीस्थळे यांचा सारासार विचार करून अशाप्रकारे उभी रहात असलेल्या अनधिकृत बांधकामांवर ठोस कारवाई झाली नाहीतर त्याचे दुष्परिणाम भविष्यात भोगावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचा प्रशासनाने जरूर विचार करून कारवाईचा बडगा उगारावा अशी मागणी स्थानिक जनतेकडून जोर धरू लागली आहे.
Be First to Comment