महावितरणच्या म्हसळा उपविभागातील खामगाव फीडरवरील लेप व कणघरसह अनेक गावे प्रकाशमान
सिटी बेल लाइव्ह / संजय कदम / रायगड #
निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड येथील श्रीवर्धनसह म्हसळा उपविभागात महावितरण यंत्रणेचे मोठे नुकसान झाले होते.खामगाव फीडर पूर्णपणे विस्कळीत झाला होता.महावितरणने खामगाव फीडरवरील लेप व कणघर सह खामगाव, ताम्हणी शिर्के, कासार मलाई, सोनघर, कृष्णानगर, खामगाव मोहल्ला, खामगाव गौलवाडी, वाघाव, कलाकीचा खोंड, गोवेले खोंड व लेप आदिवासीवाडीत पुन्हा प्रकाश आणले आहे.
भांडूप परिमंडलच्या मुख्य अभियंता सौ.पुष्पा चव्हाण यांनी वेळोवेळी सर्व गावात प्रत्यक्ष फीडरच्या कामाची पाहणी केली व कार्यकारी अभियंता, गोरेगाव आप्पा खांडेकर व कार्यकारी अभियंता, भांडूप सुरेश सवाईराम यांच्या सोबत कामाचे नियोजन केले. येथील काम तातडीने पूर्ण करण्यात यावे म्हणून पेण चे अधीक्षक अभियंता दीपक पाटील यांनी मुलतानी इलेकट्रीकल्स, अवनी इलेकट्रीकल्स, ए अँड आर इलेकट्रीकल्स, जे वी म्हात्रे इलेकट्रीकल्स तसेच जे अँड आर इलेकट्रीकल्स एजेन्सी नियुक्त केल्या.
खामगाव फीडर वरचा 30 कि.मी.चा भाग अति घनदाट व डोंगराळ असून येथे काम करणे अत्यंत कठीण होते.पावसाळा सुरु झाल्यामुळे कामात अधिक अडचण येत होती. पण महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अटल निश्चयाने कामाला सुरुवात केली व अशा कठीण परिस्थितीत सुद्धा माघार न घेत घनदाट जंगलातून व डोंगराळ भागातून विद्युत खांब खांद्यावर नेले. कार्यकारी अभियंता, भांडूप, सवाईराम यांनी दिवसरात्र परिश्रम करून, कार्यकारी अभियंता, गोरेगाव खांडेकर यांच्या मदतीने वरील काम पूर्ण केले.
खामगाव फीडरवरील 156 उच्चदाब खांब, 15 डीटीसी, 186 लघुदाब खांब प्रभावित झाले असून ते पुन्हा उभे करण्यात आले. भांडूप परिमंडलच्या मुख्य अभियंता यांनी कामाच्या जागी भेट देऊन कामाची पाहणी केली व कणघर व लेप या भागाचा वीजपुरवठा लवकरात लवकर सुरु करण्याचे निर्देश दिले. त्याप्रमाणे युद्धपातळीवर काम पूर्ण करण्यात महावितरणचे अधिकारी व कर्मचारी यशस्वी झाले. म्हसळा येथील खामगाव फीडरवरील लेप व कणघर सह खामगाव, ताम्हणी शिर्के, कासार मलाई, सोनघर, कृष्णानगर, खामगाव मोहल्ला, खामगाव गौलवाडी, वाघाव, कलाकीचा खोंड, गोवेले खोंड व लेप आदिवासीवाडी येथील 1500 ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. तसेच खामगाव फीडरवरील उर्वरित गाव मोरावाने, वांगणी व गोवेले गाव लवकर सुरु करण्याचे प्रयत्न सुरु आहे.
भांडूप विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश सवाईराम यांची खामगाव फीडरसाठी विशेष नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या व गोरेगाव विभागाचे कार्यकारी अभियंता आप्पा खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक अभियंते संदेश कदम व प्रतीक माने सोबत लाईन स्टाफ साळवी, बिरवाडकर, राजभर व कविटके यांनी विशेष परिश्रम करून वीजपुरवठा सुरळीत केला.






Be First to Comment