Press "Enter" to skip to content

भार्गव रामदास ठाकूर यांनी घातला कोट्यवधींचा गंडा

स्टोन क्रशर कॉरी टाकण्याच्या आमिषाने हडपले दोन कोटी चौदा लाख रुपये

पनवेल शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

सिटी बेल । पनवेल ।

पनवेल शहर पोलिस ठाणे हद्दीतील मौजे कुंडे वहाळ येथे आर्थिक फसवणुकीचा प्रकार घडला असून या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे.कोपर गव्हाण येथील भार्गव रामदास ठाकूर यांनी स्टोन क्रशर कॉरी टाकण्याच्या आमिषाने दिलीप रामदास घरत यांच्या कडून वेळोवेळी पैसे उकळत तब्बल 2 कोटी 14 लाख रुपयांना टोपी घातली आहे.विविध बहाण्याने पैसे देण्याचे टाळणाऱ्या भार्गव ठाकूर यांनी अखेरीस, देत नाही जा! असा अरेरावी चा पवित्रा स्वीकारल्याने दिलीप घरत यांना फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांनी पनवेल शहर पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली.

पैसे लाटणारा भार्गव ठाकूर हा भाजपा चा युवानेता असल्याचे समजते. त्याच्यावर भा द स 420 आणि 406 कलमांच्या अन्वये फसवणूक करण्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत सविस्तर हकीकत अशी की,दिलीप घरत यांचे फसवणूक केलेल्या भार्गव ठाकूर चे बंधू प्रितम यांच्या सोबत श्री इंटरनॅशनल कन्स्ट्रकशन कंपनी नावाने विमानतळाचे भरावाचे काम सुरू होते.या कंपनी चे काम बऱ्यापैकी सुरू होते.या दरम्यान दिलीप घरत आणि भार्गव ठाकूर यांनी स्टोन क्रशर कॉरी व्यवसाय सुरू करण्याचे ठरविले. सदर प्लांट मौजे कुंडेवहाळ येथे उभारण्याचे ठरले. त्यानुसार या उभयतांच्या दरम्यान 21 ऑगस्ट 2017 रोजी भागीदारी करार देखील संपन्न झाला.

स्टोन क्रेशर प्लांट सुरू करण्यासाठी जे कर्ज घ्यायचे होते त्यासाठी डाऊन पेमेंट च्या पोटी दोन्ही भागीदारांनी 74 लाख रुपये काढायचे ठरले. त्यानुसार दिलीप घरत यांनी भार्गव ठाकूर यांच्या खात्यामध्ये 74 लाख रुपये जमा केले. दिलीप घरत यांच्यापाशी तेवढ्या रकमेची तजवीज नसल्यामुळे त्यांनी राहत्या घरासह अन्य दोन मिळकतींवर तारण कर्ज घेऊन सदर रक्कम उभारली. त्यानंतर आपना सहकारी बँकेतून 4 कोटी 71 लाख रुपयांचे कर्ज मंजूर होऊन ती रक्कम भार्गव ठाकूर यांच्या खात्यात जमा झाली.

यादरम्यान दिलीप घरत यांनी रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून स्टोन क्रेशर प्लांट टाकण्यासाठी कुंडेवहाळ येथील सर्वे क्रमांक 57/01 या मिळकतीची लीज परवानगी मिळवली. परंतु प्रत्यक्षात प्लांट मात्र सर्वे क्रमांक 59 वर कार्यान्वित झालेला होता. भार्गव ठाकूर यास त्याचा जाब विचारला असता त्याने थातूरमातूर कारणे देत वेळ मारून नेली, परंतु या क्षणी त्यांनी दिलीप घरत यांचा विश्वास संपादन केलेला असल्या कारणामुळे ठाकूर यांनी त्याच्यावर जास्त संशय घेतला नाही.

सर्व्हे क्रमांक 59 वर उभारलेल्या प्लांट साठी ड्रिलिंग साठी व्हगनड्रिल मशीन दिलीप ठाकूर यांचीच लावली आहे,तसेच आर एम सी चा खर्च,हायड्रा मशीन चा खर्च, सुपर्वायझर चे वेतन,या साऱ्या पोटी दिलीप घरत यांनी 21 लाख 64 हजार रुपये खर्च केला आहे.तसेच कार्यालय उभारणी साठी 8 लाख 13 हजार रुपये खर्च केला आहे,इतकेच नव्हे तर इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर बसविणे, पर्यावरण खात्यासह अन्य परवानग्या मिळवणे यासाठी त्यांनी सन 2018 ते 2019 दरम्यान 43 लाख रुपये खर्च केले आहेत. 1 डिसेंबर 2019 रोजी सदर स्टोन क्रेशर प्लांट कार्यान्वित झाला.

भार्गव ठाकूर यांनी दिलीप घरत यांना दर महिन्याला 5 लाख रुपये देण्याचे कबूल केले होते. तसेच दिलीप घरत यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या जमिनीतून दगड 30 रुपये प्रति टन या भावाने विकत घेतला होता. त्यापोटी थकलेले देयक रुपये 6 लाख 56 हजार हे देखील भार्गव ठाकूर यांनी अद्याप दिलेले नाहीत.
इलेक्ट्रिक कनेक्शन मिळविण्यासाठी दिलीप ठाकुर यांनी महावितरणच्या वाशी कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला होता. यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालया कडून प्राप्त लीज परवान्याची प्रत जोडली होती. परंतु भार्गव ठाकूर याने इलेक्ट्रिक कनेक्शन प्राप्त करताना स्वाक्षरी मध्ये खाडा खोड करून स्वतःचे नाव नियमबाह्य पद्धतीने चढविले.

दिलीप घरत यांनी माहितीच्या अधिकारात सदर माहिती प्राप्त करविली. दिलीप घरत यांनी आजपर्यंत 2 कोटी,14 लाख 72 हजार रुपयांची सदर स्टोन क्रेशर प्लांट मध्ये गुंतवणूक केलेली असल्यामुळे ते भागीदारीच्या विषयाबाबत वारंवार विचारणा करत असत. प्रत्येक वेळी उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या भार्गव ठाकूर कडे अखेरीस दिलीप घरत त्यांनी गुंतवणूक केलेल्या पैशाच्या परताव्या बाबत विचारणा करू लागले. त्यावेळी मला विविध कामांची बिले येणार आहेत ती आली की पैसे देईल असे उत्तर भार्गव ठाकूर यांनी दिले. दरम्यान च्या काळामध्ये पैशाची मागणी केली असता भार्गव ठाकूर असंबद्ध उत्तरे देत असे. त्यानंतर कोरोना महामारी मध्ये लागलेल्या लॉक डाऊन चा बहाणा करुन त्याने पैसे देण्याचे नाकारले.

मिशन बिगीन अगेन अंतर्गत सगळ्या गोष्टी सुरळीत होऊ लागल्यानंतर दिलीप घरत यांनी पुन्हा पैशाची विचारणा केली असता भार्गव ठाकूर याने कोण तू? स्टोन क्रशरशी तुझा काय संबंध ? काय करायचं ते करून घे जा ! अशी मग्रुरीची उत्तरे दिली. तेव्हा फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने दिलीप घरत यांनी पनवेल शहर पोलीस स्टेशनमध्ये भार्गव ठाकूर या विरोधात तक्रार दाखल केली आहे. भा द सं 420 आणि 406 कलमांच्या अन्वये भार्गव ठाकूर वर गुन्हा दाखल झाला असून. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश फरताडे करत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.