Press "Enter" to skip to content

कोविड हॉस्पिटलमधील भेडसावणाऱ्या समस्यांचे उरणमधील पत्रकारांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

सिटी बेल । उरण । घन:श्याम कडू ।

कोरोनाने देशात व राज्यात हाहाःकार माजविला आहे. उरणमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. उरणमध्ये असलेल्या कोविड हॉस्पिटलमध्ये अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याने रुग्णांचा आकडा वाढत असल्याचे वाटते. तरी या समस्यांचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उरणमधील पत्रकारांनी ईमेलद्वारे पाठविले आहे. याची प्रत तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांना दिली.

उरण तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाःकार माजविला आहे. उरणमध्ये दररोजचा आकडा आता ७० रुग्णांच्या पुढे जाऊ लागला आहे. शासनाने या ठिकाणी निर्माण केलेल्या कोविड केअर रुग्णालयात या कारणामुळे दररोज रुग्णांची मोठी गर्दी होत आहे. या ठिकाणी पॉझिटिव्ह म्हणून मिळणाऱ्या रुग्णावर तातडीने उपचार होण्यासाठी डॉक्टर्सची संख्या अतिशय कमी आहे. त्यामुळे उरणच्या रुग्णांना स्थानिक ठिकाणी उपचार मिळणे दुरापास्त होत आहे.

रुग्णसंख्या ८० च्या घरात असतांना डॉक्टर केवळ ४ आहेत, त्या ठिकाणी परीचारिकांची संख्या कमी आहे. त्याचप्रमाणे वॉर्डबॉयची संख्या ही कमी आहे. त्यामुळे या ठिकाणी रुग्णांची हेळसांड होताना दिसत आहे. या सर्व बाबी पाहता भविष्यात या ठिकाणी कोरोनाचा मोठा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वाढत्या रुग्ण संख्येला उरण तालुक्यातच उपचार मिळणे आवश्यक आहे., रिपोर्ट लवकर मिळणे गरजेचे आहे. रिपोर्ट हे टेस्ट झाल्यानंतर तीन ते चार दिवस उशिरा येत असल्याने पॉझिटिव्ह रुग्ण हे बाजारात आणि परिसरात फिरत असल्याने अधिक धोका संभवतो. रुग्णांचा सध्याचा वास्तव्याच्या पत्त्याची नोंद असावी. फक्त आधारकार्ड प्रमाणे नसावे. कोविड हॉस्पिटल मध्ये रुग्णांना योग्य उपचार मिळत नसल्याने ससेहोलपट होत आहे, रुग्णालयातील वैयकीय कर्मचारी/ अधीकारी यांची संख्या वाढविणे गरजेचे आहे.

उरणमधील रुग्णांसाठी हॉस्पिटलची संख्या वाढविणे गरजेचे आहे. कोप्रोली येथे कोविड सुविधा उभारणे आवश्यक आहे. केअर पॉईंट रुग्णालय पुन्हा कार्यान्वित करावे. तालुक्यातील उपकेंद्रामध्ये रुग्ण सेवा सुरू करावी., उरण परिसरातील रुग्णांसाठी व्हेंटिलेटरची सुविधा मिळणे आवश्यक आहे. किमान दहा व्हेंटिलेटरची सुविधा ही तज्ञांसह असणे आवश्यक आहे. रुग्णांसाठी अँब्युलन्स सुविधा ही लवकरात लवकर मिळणे आवश्यक असून रुग्णवाहिकेची संख्या वाढवावी. स्थानिक प्रशासनाने तालुक्यातील कोरोना संदर्भातील माहिती पत्रकारांना द्यावी. आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. तरी आपण स्वतः जातीने यामध्ये लक्ष घालून उरणकरांच्या समस्या मार्गी लावल्यात तर नक्कीच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईल असा विश्वास उरणमधील पत्रकारांना वाटत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.