ठेकेदाराला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याची मागणी
सिटी बेल । उरण । घन:श्याम कडू ।
करंजा गावातील सुप्रसिद्ध द्रोणागिरी देवी जवळ जाणाऱ्या रस्त्याचे काम ८ दिवसांपूर्वी करण्यात आले होते. मात्र सदर काम निकृष्ट दर्जाचे असल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. तरी अशा निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याची मागणी ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे.
सदर रस्त्याचे डांबरीकरण अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे केलेल्या कामावरून स्पष्ट होते. डांबरीकरण करून ८ दिवसांचा अवधी होत नाही तोच रस्ता पुर्णपणे खचल्याचे स्पष्ट दिसत आहे. याबाबत अधिकारी वर्गाकडे विचारणा केली असता ते ठेकेदाराला वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसते. ते सांगतात ठेकेदाराचे बिल दिले नसून ते काम पूर्ण व्यवस्थित झाल्यानंतर देण्यात येईल असे सांगत त्याची पाठराखण करीत आहेत.
करंजा गावचे सुपुत्र माजी जिप अध्यक्ष रमेशशेठ डाऊर यांच्या कारकिर्दीत हा रस्ता झाला होता. रस्त्यासाठी जागाही डाऊर कुटूंबियांनी दिली आहे. त्यानंतर आता जवळपास १४ ते १५ वर्षानंतर या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. परंतु ठेकेदाराने अधिकारी वर्गाच्या संगनमताने निकृष्ट दर्जाचे काम करून मोकळा झाला होता. परंतु ग्रामस्थांनी याविरोधात तक्रारी केल्यानंतर अधिकार वर्गांनी बाजू सावरण्यासाठी ठेकेदाराकडून काम पूर्णपणे व्यवस्थित करून घेऊ असे आश्वासन ग्रामस्थांना दिले आहे. मात्र अशा निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
Be First to Comment