सिटी बेल । मुकुंद रांजाणे । माथेरान ।
कोरोना या महामारीवर नियंत्रित राखण्यासाठी रेमडीसीवर इंजेक्शने वेळेत उपलब्ध होत नसल्याने अनेक रुग्णांना वेळप्रसंगी आपले प्राण गमवावे लागले आहेत राज्यात सुध्दा बहुतांश ठिकाणी या इंजेक्शनचा तुटवडा भासत असल्याने रायगड जिल्ह्यातील माथेरान हे दुर्गम भागातील थंड हवेचे ठिकाण म्हणून जगप्रसिध्द आहे या ठिकाणी दळणवळणाची पुरेशी सोय उपलब्ध नाही त्यामुळे कोरोना रुग्णांना ही इंजेक्शने मिळविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत होती.
याकामी माथेरान नगरीच्या विद्यमान नगराध्यक्षा तथा उत्तम प्रशासक प्रेरणा प्रसाद सावंत यांनी याबाबतीत रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना विनंती करून माथेरान मधील कोरोना रुग्णांना या आजारापासून आपला बचाव करण्यासाठी अत्यावश्यक सेवा म्हणून रेमडीसीवर इंजेक्शनचा पुरवठा करण्यात यावा यासाठी अनेकदा संपर्क साधला होता त्यामुळेच एक अत्यावश्यक बाब म्हणून माथेरानला दरदिवशी चार रेमडीसीवर इंजेक्शनचा पुरवठा जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार करण्यात येणार आहे.
सदरची इंजेक्शने ही पनवेल येथील डिस्ट्रिब्युटर मार्फत मिळणार आहेत. ज्यांच्या कुटुंबातील कोरोना रुग्णांना ह्या इंजेक्शनची आवश्यकता भासल्यास त्यांनी पनवेल येथील डिस्ट्रिब्युटर कडे रुग्णांचे आधारकार्ड आणि स्वतःचे आधारकार्डची झेरॉक्स दाखविल्यानंतर आवश्यकतेनुसार ही इंजेक्शन ठराविक रक्कम देऊन खरेदी करता येणार आहेत.
पहिल्या लॉक डाऊन मध्ये माथेरान मधील कोरोना रुग्णांची संख्या कमी प्रमाणात होती. त्यानंतर डिसेंबर महिन्यात माथेरान अनलॉक झाल्यानंतर पर्यटकांना प्रवेश देण्यात आला होता त्यावेळेस हा आजार बळावला नव्हता परंतु सध्यातरी इथे पर्यटकांची रेलचेल नसताना सुध्दा गावात दरदिवशी पाच ते सहा कोरोना रुग्ण सापडत आहेत यासाठी शक्यतो नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये. शासनाने दिलेल्या नियम व अटींचे तंतोतंत पालन करावे.
जे जे लोक कोरोना बाधित झाले आहेत त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी सुध्दा काही दिवस तरी घराबाहेर पडू नये जेणेकरून हा आजार दुसऱ्यांना होणार नाही याची काळजी घ्यावी. यापुढे जे कोरोना बाधित आहेत अशांनी नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर पोलीस प्रशासना कडून कडक कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी असेही नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी सांगितले.








Be First to Comment