सिटी बेल । उरण । घन:श्याम कडू ।
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्याचा प्रत्यय उरणमध्ये ही येताना दिसत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने १ मे पर्यंत लॉकडाऊन केले आहे. परंतु उरणमध्ये आज तीन दिवसानंतर बाजारपेठ सुरू असून कोरोना जोरात तर बाजारपेठ सुसाट अशी परिस्थिती उरणमध्ये असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. याबाबत येथील शासकीय यंत्रणेकडून निश्चित अशी कोणतीही पूर्वसूचना मिळत नसल्याची चर्चा उरणच्या जनतेत सुरू आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय यंत्रणा कसोशीने प्रयत्न करीत आहे. परंतु शासनाने दिलेल्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होताना दिसत आहे. उरणमध्ये कोरोना पॉजेटीव्हचा आकडा वाढत असतानाही याबाबत शासकीय यंत्रणेकडून जनजागृती होताना दिसत नाही.
वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी शासनाने १ मे पर्यंत लॉकडाऊन केले असतानाही उरणमधील आज ३ दिवसानंतर बाजारपेठ सुरू झाल्याने बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी जनतेनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. सामान खरेदी करताना दिलेल्या नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे. याबाबत शासकीय यंत्रणेकडून कोणतेच निर्बंध नसल्याने उरण बाजारपेठेत यात्रेचे स्वरूप आले आहे.
कोरोनावर मात करण्यासाठी शासनाने लॉकडाऊन घेतले, जरी लॉकडाऊन असले तरी दुकानदार बाहेर उभा राहून दुकानाच्या आतमध्ये एक दोघेजण ठेऊन मालाची विक्री करीत असतात. त्यामुळेच जनता बाजारात गर्दी करीत असल्याचे समजते.
येथील शासकीय यंत्रणेकडून उरण शहरात व ग्रामीण भागात कशाप्रकारे लॉकडाऊन आहे याची कोणतीही माहिती अथवा जनजागृती होताना दिसत नाही. गुटखा व दारू विक्रीस बंदी असतानाही उरणमध्ये खुलेआम याची विक्री होत आहे. एवढेच नाहीतर हायवेच्या भररस्त्यावर गुटख्याची खुलेआम विक्री होत आहे. दारू विक्रीस दुकानातून बंदी करून होम डिलिव्हरी देण्याचे आदेश असतानाही भर दुपारी दारूची दुकाने उघडून विक्री केली जाते. तसेच खासगी गाड्यातून विनापरवानगी गावोगावी दारू व गुटख्याची विक्री होत आहे.
तालुक्यातील गावोगावी सर्व सुरळीत सुरू आहे. त्यामुळेच कोरोनाचा प्रादुर्भाव गावोगावी वाढत आहे. तसेच हॉटेल व चायनीज सेंटर रात्री १२ ते १ वाजेपर्यंत बिनधास्त सुरू असतात. त्याठिकाणी मद्यप्रेमी मद्य पित आस्वाद घेताना दिसत आहे. यावर नियंत्रण नसल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शासकीय यंत्रणेकडून अनेकवेळा नियमांचे पालन करण्याचे आवाहन जनतेला केले जाते. मात्र उरणमध्ये अशी कोणतीही स्थानिक यंत्रणा जनतेला सावध अथवा जनजागृती करताना दिसत नाही. मात्र पोलीस यंत्रणा प्रयत्न करते त्यांच्यावर सर्व ताण पडतो. परंतु त्यांना इतर शासकीय यंत्रणा हवी कधी साथ देताना दिसत नाही. यामुळे जनतेत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. शासनाच्या वरिष्ठांनी याची योग्य ती दखल घेऊन उपाययोजना केली नाही तर उरणमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखणे अवघड बनेल अशी चर्चा उरणच्या जनतेत नाक्यांनाक्यावर दबक्या आवाजात सुरू आहे.
Be First to Comment