Press "Enter" to skip to content

चक्रव्यूहात अडकला अभिमन्यू

चक्रव्यूहात अडकला अभिमन्यू

       महाभारतामध्ये चक्रव्यूह भेदताना मृत्यूमुखी पडलेल्या अर्जुनपुत्र अभिमन्यु ची गोष्ट सगळ्यांनाच ठाऊक असेल. त्या अभिमन्यु ने चक्रव्यूह भेदून बाहेर येण्याचे कसब ठाऊक नसताना सुद्धा अनेक दिग्गज योद्ध्यांना पराभूत करत चक्रव्यूह भेदले खरे पण तो चक्रव्यूहातून बाहेर मात्र येऊ शकला नाही. अतुलनीय धाडस दाखवत त्याने मृत्यूला कवटाळले. पण महाराष्ट्रात राज्य सरकारने जे महाभारत मांडले आहे त्यात मात्र कुठलाही गुन्हा नसताना अभिमन्यूचा बळी गेला आहे.
       राज्यामध्ये माजलेल्या अनागोंदीच्या महाभारतातील हा अभिमन्यू आहे अन्न व औषध प्रशासन आयुक्त  अभिमन्यू काळे. रेमिडिसिव्हिर औषधे उपलब्ध न होण्याचा ठपका आयुक्तांवर टाकून त्यांना या खुर्ची पासून दूर करण्यात आले आहे. त्यांच्या खुर्चीवर आता महा विकास आघाडीच्या हो ला हो म्हणणारे परिमल सिंग बसणार आहेत. या निमित्ताने हा प्रश्न निर्माण होतो की अशा प्रकारे अंगाशी आलं की बळीचा बकरा पुढे करून महाविकास आघाडी त्यांच्या निष्क्रियतेचे पाप कसे बरे झाकू शकेल? या निमित्ताने आणखीन एक गोष्ट अधोरेखित होते की या बोटावरची थुंकी त्या बोटावर जरी लावली तरीसुद्धा मूळ वाजे प्रकरणापासून महा विकास आघाडी नागरिकांचे चित्त विचलित करू शकत नाही.
            या सगळ्या प्रकरणाची सुरुवात 8 एप्रिल पासून होते. याच दिवशी  अंटीलिया जिलेटीन प्रकरणातील संशयित आरोपी सचिन वाजे खंडणी प्रकरणात परिवहन मंत्री अनिल परब सुद्धा असल्याचे पत्राद्वारे कळवतात.दुपारपासून प्रसिद्धी माध्यमे रेमिडिसिव्हिर चा तुटवडा असल्याच्या बातम्यांचा कंठशोष करायला सुरुवात करतात. दुसऱ्याच दिवशी काही टिपिकल प्रसिद्धी माध्यमांतून केंद्र सरकार लसीकरणासाठी पुरेसा साठा देत नसल्याची बोंबाबोंब होते. अर्थात या तुटवड्याच्या बातम्यांची लाट आली की वाजे परब प्रकरण शांत होईल असा भाबडा विश्वास महाविकासआघाडी मधील दिग्गजांना असावा. त्यानंतर माननीय मुख्यमंत्री टीव्ही वरती येऊन लॉक डाऊन लादण्याच्या धमक्या देऊ लागतात. कशीबशी भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यापर्यंत मुख्यमंत्री दम धरतात. त्यानंतर लगेचच लॉकडाउन लागतो. या लॉकडाऊन ला व्यापाऱ्यांच्यातून आणि नागरिकांच्यातून तीव्र विरोध दिसून येतो. पुन्हा एकदा प्रसिद्धी माध्यमांच्या आतून राळ उठवण्यासाठी नवाब मलिक बेसलेस आरोपांच्या साठी उर बनवून घेतात.रेमिडिसिव्हिर तुटवडा सोबत एव्हाना ऑक्सिजन तुटवडा सुद्धा होऊ लागलेला असतो. या सगळ्या गोष्टी कारखानदारांनी द्याव्यात या स्वरूपाची अपेक्षा बाळगणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या मदतीला टाटा अंबानी अदानी यांच्यासारखे भांडवलदार धावून येतात. एरवी यांच्या नावाने शंख करणाऱ्या महाविकासआघाडी मध्ये तात्कालिक शांतता पसरते.
         या दरम्यान पुन्हा एकदा हाय व्होल्टेज ड्रामा घडतो.60 हजार रेमिडिसिव्हिर देणाऱ्या ब्रुक्स फार्मा कंपनीच्या मालकाला मुंबईचे पोलीस अर्नब गोस्वामी स्टाईलने उचलतात. याची कुणकुण लागताच देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर त्याचा जाब विचारायला पोलीस स्टेशनला पोहोचतात. महा विकास आघाडी चे मित्र असणाऱ्या माध्यमांतून या प्रकरणाचा विस्फोट केला जातो.रेमिडिसिव्हिर चा काळाबाजार करत असल्याचा ठपका फडणवीस आणि दरेकर यांच्यापर्यंत ठेवण्याची मजल प्रसिद्धी माध्यमांची जाते. अखेरीस महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांना प्रसिद्धी माध्यमांसमोर येत हा औषध साठा महाराष्ट्र साठीच होता अशी कबुली द्यावी लागते.महाविकास आघाडी चे राऊत,मलिक, अव्हाड आदी आघाडीचे मिडिया विर अचानक शांत होतात.य दरम्यान निखिल वागळे यांसारखे मिडिया बाह्य झालेले पत्रकार अचानक जागृत होऊन महाविकास आघाडीच्या मदतीला येतात.
        आज कोरोना महामारी च्या काळामध्ये अत्यंत वाईट पायंडा पाडला जात आहे. महाराष्ट्रात महा विकास आघाडी सरकारकडून एखादा अक्षम्य गुन्हा झाला, तर प्रसिद्धी माध्यमे आणि महा विकासआघाडीतील वाचाळवीर तशाच स्वरूपाचा गुन्हा उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश गुजरात आदी भाजप सक्षम असणाऱ्या राज्यात घडतो का? इथे डोळे लावून बसलेले असतात. महा विकास आघाडीच्या विरोधात बोलणार्‍यांना मराठी भय्या, गुजराती एजंट अशा शेलक्या शब्दात उच्चारून मंत्रीगण मीडियावर जाऊन शोभा करून घेतात.
      या सगळ्या प्रकरणांमध्ये महाराष्ट्र मात्र रोज पिचला जातोय, लसीकरण थंडावले आहे, ऑक्सिजनच्या साठ्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. आलेला ऑक्सिजन आपण सांभाळू शकू का? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण नाशिक मध्ये ऑक्सिजनच्या गळतीमुळे 22 जीव हकनाक प्राण गमावून देवा घरी गेले आहेत.
अभिमन्यू काळे यांचा बळी देण्यापूर्वी रेमिडिसिव्हिर च्या एकंदरीत वापराबद्दल, त्याच्या प्रभावी असण्याबद्दल, औषध साठा उपलब्धतेबद्दल आणि ते राज्याच्या कानाकोपर्‍यात पोहोचवण्यात बद्दल एक तरी विधायक बैठक मुख्यमंत्र्यांनी घेतली का?मुळात रेमिडिसिव्हिर हे कोव्हिड वरचे औषध नाही.त्याचा अतिरेक होतो आहे. या औषधाचे शेल्फ लाइफ कमी आहे. म्हणजे निर्माण केल्यापासून अवघ्या चार महिन्यात हे औषध एक्सपायर होते. त्यामुळे दुसरी लाट येण्यापूर्वी हजारो इंजेक्शन्स एक्सपायर होऊन गेली आहेत. आज राज्यात अचानक तुटवडा निर्माण झाला असेल तर त्यासाठी अभिमन्यू काळे यांचा बळी का म्हणून द्यावा? आणि कोणाच्याही आरवण्याने का होईना सूर्य उगवणे महत्त्वाचे हे जर खरे असेल तर भाजपा वाल्यांच्या प्रयत्नाने का होईना, औषध उपलब्ध होत आहे हेसुद्धा सकारात्मक होते की. त्याकरता आकस बुद्धीने या अभिमन्यूचा बळी देणे योग्य होणार नाही.असे आणखीन बळी दिले जातील.बात निकली है तो दूर तक जाएगी….तुम्ही घरात रहा,सुरक्षित राहा, सोशल डिस्टन्स पाळा,हात धुवत रहा.यातून कित्येक जण आपापले हात धुऊन घेणार आहेत ते अलहीदा…

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.