विचारधारा-६ *कर्म*
आपण करीत असलेली प्रत्येक क्रिया हेच कर्म आहे. ही कर्म कळत-नकळत घडत असतात. शारीरिक स्तरावर घडणाऱ्या कर्मांपेक्षा मानसिक स्तरावर होणारी कर्मे जास्त प्रभावी असतात. जसे की, कल्पना करणे, कोणाला पाहून आतल्या आत घृणा करणे, कोणाबद्दल तरी सकारात्मक विचार करणे वगैरे.
शास्त्रांमध्ये सात कर्मांचा उल्लेख आहे.
१) नित्यकर्म (जे आपण दररोज करतो.)
२) नैमित्तिक कर्म (नियमानुसार बंधनकारक असलेले कर्म.)
३) सकाम कर्म( मनातील हेतुपूर्वक केलेले कर्म. )
४) निष्काम कर्म (मनात कोणताही हेतू न ठेवता केलेले कर्म.)
५) संचित कर्म ( भाग्यानुसार करावे लागणारे कर्म.)
६) निषिद्ध कर्म (न करण्यासारखे कर्म.)
७) आगामी कर्म ( जे ज्या जन्मात आपण करू ते कर्म.)
जे कर्म आपण निव्वळ दुसऱ्याचे किंवा स्वतःचे हितास अनुकूल असे सन्मार्गाने केले जाते ते सत्कर्म होय. मग ते शारीरिक व मानसिक पातळीवर शुद्ध व एकरूप असले पाहिजे.
शरीराने दुसऱ्याचे वा स्वतःचे चांगले पण मानसिकरित्या मात्र याबाबतीत कमकुवतपणा बाळगला किंवा याउलटही; तर ते सत्कर्म म्हणता येत नाही. म्हणून
सत्कर्मे फुलवी बाग पुण्याईची;
दुष्कर्मांना जागा दिली पापरुपी दरीची…
अशा वेळी सदसद्विवेकबुद्धी म्हणजे चांगले-वाईट काय? हे जाणून घेण्याची सारासार बुद्धी जागृत ठेवावी, की मग हातून सत्कर्मेच घडतील अगदी मनापासून!!
✍️लेखिका ✍️
श्वेता जोशी.







Be First to Comment