Press "Enter" to skip to content

नागोठणे प्रा.आ.केंद्रात १२३३ जणांना कोविड-१९ चे लसीकरण

सिटी बेल । नागोठणे । महेश पवार ।

शासनाने कोविड १९ चे लसीकरण सुरु केल्यापासून नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात ८ मार्च ते १३ एप्रिल, २०२१ यादरम्यान एकूण १ हजार २३३ जणांना कोविड प्रतिबंधक लसीचे लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याची माहिती नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डाॅ. चेतन म्हात्रे यांनी दिली.

नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात ८ मार्चला कोविड प्रतिबंधक लसीचे लसीकरण ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना सुरु करण्यात आले होते. यावेळी आठवड्यातून तीन वेळा हे लसीकरण सुरु करण्यात आले होते. मात्र त्यावेळी अत्यल्प प्रतिसाद आल्याने पहिल्याच दिवशी केवळ १० नागरिकांनी लसीकरण केले होते. त्यानंतर १० मार्चला ५० नागरिकांनी हे लसीकरण करुन घेतले होते. त्यानंतर लसीकरणास चांगला प्रतिसाद मिळण्यास सुरूवात झाल्यानंतर रविवार वगळता दररोज लसीकरण सुरु करण्यात आले. ५ एप्रिल पर्यंत तर ६७४ ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरण करुन घेतले होते. त्यानंतर प्रशासनाच्या सूचनेनुसार ४५ वरील नागरिकांनाही लसीकरण करण्यास सुरुवात झाल्यानंतर ६ एप्रिल रोजी ४५ वर्षांवरील २६ जणांना लसीकरण करण्यात आले. त्यानंतरही ४५ वर्षांवरील अनेक नागरिकांनी लसीकरण करुन घेतले. त्यामुळे नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी उपलब्ध झालेला साठा १३ एप्रिलला संपुष्टात येईपर्यंत पहिल्या टप्प्यात १२३३ नागरिकंनी शिस्तबद्ध पद्धतीने, कोणतीही गडबड – गोंधळ न करता कोविडच्या पहिल्या डोसचे तर काहींनी दुस-या डोसचे लसीकरण केले आहे.

याशिवाय नागोठणे प्रा.आ.केंद्रात मोठ्या प्रमाणात रॅपिड अँटीजन तपासण्या करण्यात आल्या असून ३१ आॅगस्ट, २०२० ते आजपर्यंत आरोग्य केंद्रात ८०७ रॅपिड अँटीजन तपासणी करण्यात आल्या असून त्यामध्ये १४३ पॉझिटिव्ह आणि ६६४ निगेटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रातील ही कोविड लसीकरण व रॅपिड अँटीजन तपासणी मोहिम यशस्वी होण्यासाठी नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. चेतन म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली डाॅ. चैत्राली पवार, आरोग्य सहाय्यक मधुकर करजेकर, आरोग्य सहाय्यक हिरामण डोलकर, आरोग्य सेवक वंदन तांबोळी, आरोग्य सेविका प्रतिभा ताडकर, आल्हाद पिंगळे, नागोठण्यातील १० आशा सेविका आदींसह नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी सहकार्य करीत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.