Press "Enter" to skip to content

नागोठण्यातील कामत हाॅटेल प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित

नागोठण्यातील कामत हाॅटेल मधील १३ जणांचे गृह विलगीकरण : एक जणावर कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरु

सिटी बेल । नागोठणे । महेश पवार ।

मुंबई – गोवा महामार्गावरील व नागोठण्याजवळील कोंडगावकडे जाणाऱ्या फाट्याजवळ असलेल्या प्रसिद्ध हाॅटेल कामत मधील कर्मचारी असलेल्या १३ कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांना कामत हाॅटेलच्या मागील बाजूसच असलेल्या इमारती मध्येच गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे तर एक कर्मचारी रुग्णावर वेलशेत येथील भाएसोच्या विद्यासंकुलात रिलायन्स कंपनी कडून सुरु असलेल्या कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरु आहेत.

दरम्यान ग्रामपंचायत प्रशासनाकडून हाॅटेल व परसराला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असून तसा फलकही हाॅटेलच्या प्रवेश द्वारात लावण्यात आला आहे. तसेच याठिकाणी पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.

मुंबई – गोवा महामार्गालगतच व नागोठण्याजवळ असलेल्या या हाॅटेल मधील एक कर्मचाऱ्याला कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्याने या हाॅटेल मधील सुमारे २५ ते ३० कर्मचाऱ्यांच्या कोरोना तपासण्या शुक्रवार दि. ९ एप्रिल रोजी नागोठणे प्रा.आ.केंद्रात करण्यात आल्या होत्या. त्यापैकी १४ जणांचे कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने व नागोठण्यात एकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण आढळल्याची ही पहिलीच वेळ असल्याने नागोठणे शहर व परिसरात खळबळ निर्माण होऊन नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

मुंबई – गोवा महामार्गालगतच असलेले हे हाॅटेल शुध्द शाकाहारी व जैन फुड साठी प्रसिद्ध आहे. याशिवाय निसर्गरम्य वातावरण असलेल्या या हाॅटेल मध्ये निवासाचीही अलिशान व्यवस्था असल्याने मुंबई, ठाणेहून महाबळेश्वर, कोकणात तसेच गोव्याकडे फिरण्यासाठी जाणारे पर्यटक आवर्जून चहा, नाश्ता, जेवण तसेच विश्रांतीसाठी या हाॅटेलला पसंती देत असतात. त्यामुळे या हाॅटेल मध्ये नेहमीच पर्यटकांची गर्दी असल्याचे दिसून येते. दरम्यान याच हाॅटेल मधील १४ कर्मचारी कोरोना पाॅझिटिव्ह झाल्याने या हाॅटेल मध्ये चहा, नाश्ता, जेवण व राहण्यासाठी येऊन गेलेल्या ग्राहकांनाही या पाॅझिटिव्ह कर्मचाऱ्यांच्या संपर्कातून कोरोनाची लागण झाल्याची शक्यताही नाकारता येत नाही.

दरम्यान प्रशासन व आरोग्य विभागाकडून हे हाॅटेल तातडीने शुक्रवारीच बंद केले असले तरी या हाॅटेल मध्ये येऊन गेलेल्या पर्यटक ग्राहकांचा शोध कसा घ्यावा याचे मोठे आव्हान यंत्रणेसमोर आहे. त्यामुळे या हाॅटेलमधील पाॅझिटिव्ह कर्मचाऱ्यांमुळे रुग्ण वाढण्याच्या भितीने प्रशासनाच्या चिंतेतही भर पडली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.