सुधागड तालुक्यात विवाहित महिला बेपत्ता…!
सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल सावंत)
सुधागड तालुक्यात अचानकपणे बेपत्ता होणाऱ्या नागरिकांच्या संख्येत वाढ होतांना दिसत आहे. नंदीमाळ नाका येथील प्राजक्ता प्रदीप खाडे (वय 32) मूळ राहणार रासळ, तालुका – सुधागड येथील महिला 9 जून पासून पालीतून बेपत्ता झाली आहे.
सदर महिला 9 जून रोजी रोजी सकाळी 9 वाजता पेण येथून पाली अडुळसे येथे जाण्याकरिता निघून सुमारे 11 वाजता पाली भोईआळी नाका येथील विक्रम स्टॅंडवर आली होती. तेथे भाचा प्रतिकेश यास अडुळसे येथे घरी जाते असे सांगून पाली विक्रम स्टँडवरून कोणाला काही एक न सांगता कोठेतरी निघून गेली आहे. ही महिला हरवल्याची तक्रार दिनांक 14 जुलै रोजी पाली पोलीस ठाणे येथे महिलेचा पती प्रदीप प्रभाकर खाडे राहणार नंदीमाळ नाका, तालुका – पेण मूळ राहणार रसाळ, तालुका – सुधागड यांनी दिली आहे. महिलेचे वर्णन वय 32 वर्ष, उंची पाच फूट, वर्ण निमगोरा, अंगाने मध्यम, चेहरा उभट, नाक सरळ, अंगात शेवाळी रंगाचा पंजाबी ड्रेस व पायजमा, केस काळे, गळ्यात काळ्या मन्यांमध्ये ओवलेले छोटे मंगळसूत्र, पायात लाल रंगाची सॅंडल असे या हरवलेल्या महिलेचे वर्णन आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक एन. व्हि. घासे करत आहेत. सुधागड तालुक्यातील गायमाळ आदिवासीवाडी येथून एक 23 वर्षीय तरुणी 27 जूनपासून अचानकपणे बेपत्ता झाली आहे. बेपत्ता नागरिकांमध्ये वाढ होत असल्याने तालुक्यात चिंतेचे वातावरण आहे.






Be First to Comment