सिटी बेल । उरण । वैशाली कडू ।
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा मोठ्या वाढला आहे. त्यामुळे 1 ते 8 इयत्ता पर्यंतच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतला आहे. मात्र दहावी व बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुन्हा लॉकडाऊनची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे दहावी व बारावीच्या परिक्षाबाबत विद्यार्थी व पालक वर्गात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी याबाबतही शिक्षणमंत्री गायकवाड यांनी ठोस निर्णय जाहीर करावा अशी मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घन:श्याम कडू यांनी केली आहे.
मागील वर्षाप्रमाणे याही वर्षीही कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. आजच्या घडीला दिवसेंदिवस कोरोनाचा आकडा वाढत चालला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा लॉकडाऊन करण्याचा इशारा देत त्यादृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी 1 ली ते 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करून त्यांना पास करण्याचा निर्णय घेतला आहे.
परंतु काही दिवसांवर दहावी व बारावीच्या परीक्षा होणार आहेत.
याबाबत वाढत्या कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ठोस निर्णय घेणे आवश्यक बनले आहे. दहावी व बारावीच्या प्रॅक्टिकल परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. लेखी परीक्षा काही दिवसांत सुरू होणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालल्याने पालक व विद्यार्थी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याचा सारासार विचार करून दहावी व बारावीच्या परीक्षा लवकरात लवकर पूर्ण कराव्यात अशी मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घन:श्याम कडू यांनी केली आहे.








Be First to Comment