Press "Enter" to skip to content

दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

बेलदार समाजाच्या महिलांनी केली मागणी : राज्याध्यक्ष राजू साळुंके यांना दिले निवेदन

चोंढी येथे केले श्रीनिवास रेड्डी आणि विनोद शिवकुमार यांच्या पुतळ्याचे दहन

सिटी बेल । रायगड । अमूलकुमार जैन ।

अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वनपरीक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच आरोपी शिवकुमार असला तरी दीपाली चव्हाण यांच्या तक्रारींकडे डोळेझाक करणार्‍या इतर आरोपींनाही सहआरोपी करण्यात यावे, अशी मागणी रायगड जिल्ह्यातील बेलदार भटका समाजाच्या महिलांनी अलिबाग तालुक्यातील चोंढी येथे एकत्रित येत केली.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांना आत्महत्या करण्यास भाग पाडणाऱ्या श्रीनिवास रेड्डी आणि विनोद शिवकुमार यांच्या पुतळ्यास पादत्राणे यांचे फटके मारीत त्याचे दहन करण्यात आले. यावेळी दीपाली चव्हाण यांना न्याय मिळावा यासाठी महाराष्ट्र बेलदार भटका समाजाचे अध्यक्ष राजू साळुंके यांना निवेदन सादर करण्यात आले.

बेलदार समाजाच्या महिलांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी उपवनसंरक्षक शिवकुमार ह्यांनी दिलेला त्रास तसेच अश्‍लील बोलून गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केल्याने आत्महत्या केली आहे. ह्या प्रकरणात अमरावती शिवकुमार पोलीसांनी नागपुरातून अटक केलीय. मात्र ह्या प्रकरणात अत्यंत गंभीर आरोप मृत वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली यांनी केले आहेत. रेडडी नावाचे अपर प्र. मु. व. संरक्षक तथा क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती ह्यांनी शिवकुमार विरोधात केलेल्या तक्रारी वर कुठलीही कार्यवाही केली नाही. महिला अधिकार्‍याचा छळ आणि आत्महत्या प्रकरणात रेडडी नावाचे अधिकारी देखील दोषी असल्याचे दिसते. सबब या प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून इतर दोषी अधिकारी ह्यांना सह आरोपी करण्याची मागणी आमच्या वतीने करण्यात येत आहे.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातंर्गत येणार्‍या हरीसाल येथील वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी शासकीय निवासस्थानी गोळी झाडून गुरूवारी आत्महत्या केली आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा माध्यमातून समोर आले आहे. दीपाली चव्हाण यांच्या सुसाइड नोटमध्ये काही वरीष्ठ अधिकार्‍यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. या अनुषंगानेच उपवनसंरक्षक शिवकुमार यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी रेडडी ह्यांचे नावे लिहीलेल्या सुसाईड नोटमध्ये धक्कादायक आरोप आहेत, शिवकुमार नावाचे अधिकारी गावकर्‍यासमोर, मजुरां समोर शिवीगाळ करतात. एकटेपणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. अधिकारी कुठेही बोलवतात, अश्‍लील बोलतात, असे दीपाली ह्यांनी नमूद केले असून रेड्डी ह्यांचेकडे तक्रार केली असता रेड्डी हे शिवकुमार ह्यांना पाठीशी घालतात, असे नमूद आहे.
केलेल्या कामाचे पैसे न काढणे, सुट्ट्या नाकारणे, न्यायालयाचा निर्णय असताना रुजू न करून घेणे, असे देखील नमूद आहे. शिवकुमार ह्यांच्या असंख्य तक्रारी असताना रेड्डी गांभीर्याने घेत नसल्याने मेळघाट दलदल बनल्याचा आरोप देखील केलेला आहे.

मृत महिला अधिकारी दिपाली ह्यांचे आरोप पाहता वन विभाग हा महिला अधिकारी ह्यांचे करीता छळ छावणी बनला आहे असे दिसते. वन विभागाचे अधिकार्‍यांना महिला अधिकारी व कर्मचारी सहज सावज वाटतात. वरीष्ठ अधिकारी ह्या तक्रारीवर कार्यवाही करीत नसल्याने एका महिला अधिकार्‍याला जीव द्यावा लागला. वन विभागाने कामाच्या ठिकाणी होणारी महिला अधिकारी, कर्मचारी ह्यांच्या लैंगिक छळ ह्यावर काहीही तरतूद केल्याचे दिसत नाही. सबब महाराष्ट्रभर वनविभागात कार्यरत महिला अधिकारी व कर्मचारी ह्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा होणे गरजेचे आहे.

यावेळी दीपाली चव्हाण यांना श्रद्धांजली अर्पण करीत असताना उपस्थित महिलांचा आक्रोश दिसत होता.दीपाली चव्हाण यांना न्याय मिळाला पाहिजे, दीपाली चव्हाण यांना आत्महत्या करण्यासाठी जबाबदार असणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल व्हावा,त्यांना फाशी झाली पहिजे असा घोषणाही देण्यात आल्या.

दीपाली चव्हाण प्रकरणात शिवकुमार व इतर अधिकारी ह्यांचे बाबत केलेल्या आरोपा नुसार सहभागी सर्व अधिकारी सहआरोपी करण्यात यावे, वन विभागाचे सीसीटीव्ही डेटा जप्त करून त्याची तपासणी व्हावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर स्नेहा पवार,अनसूया साळुंके, अपर्णा मोहिते,नम्रता साळुंके, सुरक्षा चव्हाण, रेश्मा मोहिते,अर्पण जाधव,अनिता पवार,सविता पवार आदीसाहित अन्य महिलांच्या सह्या असून निवेदनाच्या प्रती महाराष्ट्राचे मुुख्यमंत्री उद्धव ठाकरे,वनमंत्री, राज्य महिला आयोग, पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुख्य वनसंरक्षक महाराष्ट्र, पाठवल्या आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.