रायगड शिळोशीत अल्पवयीन मुलीला खाण्यास भाजलेला मका देऊन केला विनयभंग : पाली पोलीस स्थानकात पास्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल,आरोपी अटकेत
सिटी बेल । रायगड । धम्मशील सावंत ।
राज्यात युवती व महिलांवरील वाढत्या अन्याय अत्याचार व लैगिक शोषणाच्या घटनांत वाढ झाली आहे. रायगड जिल्ह्यात देखील अशा घटना वारंवार समोर येत आहेत. अशातच सुधागड तालुक्यातील शिळोशीत एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने सर्वत्र संताप व चीड व्यक्त होत आहे. याप्रकरणी पास्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
यासंदर्भात पाली पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिळोशी येथील तक्रारदार व त्यांचे कुटुंबीय 1 एप्रिल रोजी कामधंद्याकरिता बाहेर गेले असता घराच्या ओटीवर फिर्यादी यांची 7 वर्ष 3 महिने वयाची नात ही खेळत असताना घरात कोणीही नाही व ती विकलांग व लहान असल्याचा फायदा घेऊन तिला सायंकाळी 03 ते 06 वाजताच्या दरम्यान आरोपी मोहन धोंडू शिर्के वय 48, रा.शिळोशी याने त्याचे राहते घरात नेऊन घराचे दोन्ही दरवाजे बंद करून भाजलेला मका खायला दिला. त्यानंतर या नराधमाने तिचा विनयभंग केला. त्यानंतर तिला चहा पिण्यास देऊन हा प्रकार तुझ्या घरात सांगू नकोस अशी शपथ देऊन धमकावले.
याप्रकरणी पाली पोलीस स्थानकात गुन्हा र.नं . 34/2021 भादवी कलम 354 सहकलम 8,9, के (एम),10, 11, (1),(2),12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विजय तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि श्री साबळे करीत आहेत.








Be First to Comment