एका दिवसात 3 हजार 200 रुपयांचा दंड वसूल
सिटी बेल । पाली/ रायगड । धम्मशील सावंत ।
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी पाली सुधागडात प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. मास्क न घालणाऱ्यांवर पाली नगरपंचायतीकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली. यावेळी 22 जणांकडून तब्बल 3 हजार 200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
सर्व नागरिकांना मास्क वापरण्याची सक्ती नगरपंचायतीकडून वेळोवेळी करण्यात आली आहे. मात्र तरीही काहीजण मास्क वापरत नाहीत. त्यामुळे मास्क न लावणाऱ्या नागरिकांवर नगरपंचायत प्रशासक दिलीप रायन्नावार यांच्या आदेशाने दंडात्मक कारवाई करण्यात आली. बुधवारी करण्यात आलेली ही तिसरी कारवाई होती.
पाली नगरपंचायतीने दंडात्मक कारवाईसाठी टीम पाठवली होती. या टीम मध्ये पाली नगरपंचायतीचे कर्मचारी राजेश कोंजे व प्रविण थळे सहभागी झाले होते. केवळ नगरपंचायतीचे कर्मचारी कारवाईसाठी उभे राहिले की, स्थानिक लोक वाद घालतात. त्यामुळे या कारवाईवेळी पोलीस निरीक्षक विजय तायडे यांनी पोलीस अंमलदार एस.बी.साळवे व पोलीस अंमलदार शेडगे यांना नियुक्त केले होते.








Be First to Comment