Press "Enter" to skip to content

सामुहिक बलात्कार प्रकरणातील फरार आरोपी अखेर जेरबंद

सिटी बेल । पनवेल । वार्ताहर ।

खारघर येथील सामुहिक बलात्कार प्रकरणातील फरार असलेल्या मुख्य आरोपीला चेंबूर येथून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. अभिषेक अजित खरात (31) असे या आरोपीचे नाव असून 3 फेब्रुवारी अभिषेक आणि त्याचा साथीदार तेजस देवळेकर (19) या दोघांनी आपल्या ओळखीतील 19 वर्षीय तरुणीवर सामुहिक लैंगिक अत्याचार करुन पलायन केले होते.

त्यानंतर पोलिसांनी तेजसला अटक केली होती. तर अभिषेक फरार झाला होता.
सदर घटनेतील पिडीत तरुणी आणि तिच्यावर सामुहिक लैंगिक अत्याचार करणारे आरोपी सर्व खारघरमध्ये एकाच भागात राहणारे असून ते पिडीत तरुणीच्या ओळखीतील होते. 3 फेब्रुवारी रोजी रात्री पिडीत तरुणी रहात असलेल्या भागात हळदीचा कार्यक्रम असल्याने ती आई-वडीलांसह हळदीच्या कार्यक्रमासाठी गेली होती.

यावेळी पिडीत तरुणीला तहान लागल्याने ती पाणी पिण्यासाठी गेली असताना, आरोपी अभिषेक आणि तेजस या दोघांनी तिला जवळच असलेल्या मिनी बसमध्ये नेऊन शितपेयात दारु मिसळून तिला पिण्यासाठी दिले होते. त्यामुळे पिडीत तरुणी बेधुंद झाल्यानंतर दोघांनी बसमध्येच तिच्यावर आळीपाळीने लैंगिक अत्याचार केला होता. त्यांनतर दोघांनी तिला अंधारात तळोजा भागात निर्जनस्थळी नेऊन सोडले होते.

त्यानंतर पिडीत तरुणीने काही नागरिकांच्या मदतीने आपले घर गाठून घडल्या प्रकाराची माहिती आपल्या कुटुंबियांना दिली होती. त्यानंतर दुसर्‍या दिवशी खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. सदर तक्रारीवरुन पोलिसांनी अभिषेक आणि तेजस या दोघांवर सामुहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करुन तेजस देवळेकर याला तत्काळ अटक केली होती. मात्र, या घटनेतील मुख्य आरोपी अभिषेक खरात फरार झाला होता. मागील दिड महिन्यांपासून खारघर पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र, तो पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर आरोपी अभिषेक खरात चेंबूर येथील लाल डोंगर परिसरात लपून रहात असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर पवार यांना मिळाल्यानंतर त्यांनी चेंबूर पोलिसांना याबाबतची माहिती दिली होती. त्यानुसार चेंबूर पोलिसांनी लाल डोंगर परिसरातून अभिषेक याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर तो खारघर येथील सामुहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी असल्याचे निष्पन्न झाले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.