आपल्यातल्या प्रत्येकासाठी
मनात खूप साचलं ना
की आभाळपण झाकोळल्यासारखं होतं..
टळटळीत उन्हाचा दिवस
पण आत सगळं अंधारून जातं…
मान- अपमान, समज- गैरसमज
उगाचच सगळे मोठ्ठे होतात…
चूक बरोबरच्या तराजूत तोलताना
नकळत समोरच्या माणसालाच विसरतात..
आपलंही कुठे चुकलेलं असतं
समोरच्या मनात रूजलेलं राहतं…
मग एखाद्या निसरड्या क्षणी
मोठ्या आवाजात कानावर आदळतं..
हीच ती वेळ असते
स्वतःला सावरण्याची ….
माझं मी पण बाजूला करत
समोरच्यालाही आधार देण्याची..
आपलं मानता ना त्याला तुम्ही?
मग ठामपणे समोर उभे राहा…
वय नाती सगळं विसरून
एकदा मोकळे होऊन तर पाहा…
दोन शब्द बोलताना, दोन शब्द झेलताना
मन हलकं होत जातं…
कारण नुसतं साचत राहिलं की
त्याचं पण डबकं होतं…
मग ही रिकामी जागा
आनंदाने भरून टाकूया…
प्रेम,आपुलकी, आधाराची
रेशीमगाठ पुन्हा बांधूया…
महत्त्वाची असतात आपली माणसं
शब्दांनी निर्मिलेलं भांडण नव्हे…
एकदा जगातून निघून गेली
की कशालाच किंमत न उरे…
वरदा जोशी, नवीन पनवेल







खुप छान