धक्कादायक : नपुंसक असल्याची बाब लपवून ठेवत तरुणीसोबत लग्न करणाऱ्या डॉक्टर व त्याच्या कुटुंबियाविरोधात गुन्हा दाखल
सिटी बेल । पनवेल ।
धुळे जिह्यातील एका एमबीबीएस डॉक्टरने नपुंसक असल्याची बाब लपवून ठेवत नवीन पनवेल भागातील एका 26 वर्षीय बीएचएमएस डॉक्टर तरुणीसोबत विवाह करुन तिची व तिच्या कटुंबियांची फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे या डॉक्टर व त्याच्या कुटुंबियांनी तरुणीच्या कुटुंबियांकडून लग्नात व त्यांनतर वेगवेगळी कारणे सांगून 40 लाखांपेक्षा अधिक रक्कम उकळ्याचे देखील उघडकिस आले आहे.
खांदेश्वर पोलिसांनी या प्रकरणातील नपुंसक डॉक्टरसह त्याचे आई-वडील, बहिण व बहिणीचा पती या सर्वांवर फसवणुकिसह छळवणुकिचा गुन्हा दाखल केला आहे.
या घटेनेतील तक्रारदार तरुणी नवीन पनवेल भागात राहाण्यास असून ती बीएचएमएस डॉक्टर आहे. तर तिच्यासोबत लग्न करणारा एमबीबीएस डॉक्टर हा धुळे जिह्यातील आहे. मार्च 2018 मध्ये ओळखीतून या दोघांचा विवाह ठरला होता. मात्र साखरपुडा होण्यापुर्वीच डॉक्टरच्या आई-वडीलांनी आपल्या मुलाला दवाखाना टाकण्यासाठी 30 लाख रुपयांची मागणी केली. अन्यथा साखरपुडा होणार नसल्याचे सांगितले. मुलीचे लग्न मोडेल व समाजामध्ये मानहानी होईल या भितीने तरुणीच्या वडीलांनी 30 लाख रुपये देण्याचे कबुल करुन 5 लाख रुपये दिले. तसेच उर्वरीत रक्कम टप्या टप्याने देण्याचे आश्वासन दिल्यानंतर या दोघांचा साखरपुडा एप्रिल 2018 मध्ये धुळे येथे पार पडला. साखरपुड्याचा 85 हजारांचा खर्च देखील तरुणीच्या वडीलांनीच केला.
त्यांनतर काही दिवसातच तरुणीच्या वडीलांनी 25 लाखांची रक्कम डॉक्टरच्या कुटुंबियांना दवाखाना टाकण्यासाठी दिली होती. त्यांनतर लग्नासाठी वऱ्हाडी मंडळींना धुळे येथून पनवेल येथे आणण्यासाठी बसेस व जेवणासाठीचे सव्वा दोन लाख रुपये तरुणीच्या वडीलांनी खर्च केले. तसेच मुलीच्या हळदीसाठी सव्वा लाख रुपये, लग्नाचा हॉल, जेवणावळी, डेकोरेशन याचा 3 लाख 42 हजारांचा खर्च देखील तरुणीच्या वडीलांनीच केला. त्याचप्रमाणे तरुणीला 2 लाख 70 हजार रुपयांचे वेगवेगळे दागिने सुद्धा दिले.
लग्न समारंभ पार पडल्यानंतर धुळे येथे डॉक्टरच्या कुटुंबियांकडून रिसेप्शन ठेवण्यात आले होते. त्याचा 1 लाख 12 हजारांचा खर्च देखील तरुणीच्या वडीलांनाच करण्यास डॉक्टरच्या बहिणीने व तिच्या पतीने भाग पाडले होते. लग्नानंतर तरुणी धुळे येथे सासरी नांदण्यासाठी गेल्यानंतर पहिल्याच रात्री मी तुला बाळ देऊन शकत नाही, असे या डॉक्टरने, तरुणीला सांगितले होते.
त्यानंतर शिमला कुलु मनाली येथे फिरण्यासाठी पती-पत्नी गेले असताना, डॉक्टरने तरुणीसोबत शरीसंबध करण्यास नकार देऊन तिला टाळले.
याबाबत तरुणीने विचारपुस केल्यांनतर त्याने शरीर संबध ठेवण्यास असमर्थ असल्याचे व तिला बाळ देऊ शकत नसल्याचे सांगितले. तसेच त्याबाबत दवाखान्यामध्ये उपचार सुरु असल्याचे त्याने सांगितले. ही बाब त्याचे आई-वडिल, बहिण व बहिणीचे पती या सर्वांना माहित असल्याचे देखील त्याने तरुणीला सांगितले. आपला पती नपुंसक असल्याचे समजल्यानंतर तरुणीला मानसिक धक्का बसला. त्यामुळे तिने याबाबतची माहिती आपल्या आई-वडिलांना दिली. त्यानंतर तरुणीच्या वडिलांनी डॉक्टरच्या कुटुंबियांना पनवेल येथे बोलावून घेऊन त्यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी तरुणीच्या वडीलांची माफी मागून आपल्या मुलावर उपचार सुरु असल्याचे व त्यातुन तो लवकरच बाहेर येईल असे आश्वासन दिले होते.
त्यामुळे तरुणीच्या वडीलांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून तरुणीला त्यांच्या सोबत पाठवून दिले होते. मात्र त्यानंतर डॉक्टरच्या कुटुंबियांनी तरुणीच्या वडीलांनी लग्नात सोन्याचा लक्ष्मीहार व सोन्याचे दागिने दिले नसल्याचे सांगत तरुणीसोबत भांडण काढण्यास सुरुवात केली. तसेच सोन्याचे दागिने न दिल्यास तिला नीट वागविणार नसल्याचे धमकावण्यास सुरुवात केली. तसेच तरुणीने माहेरुन सोन्याच्या दागिन्यांची मागणी करत तिला नेहमी टोचून बोलणे, शिवीगाळ करुन अपमानीत करण्याचे प्रकार सुरु केले. मात्र हा छळ ती निमुटपणे सहन करत राहिली. नोटबंदीच्या काळात तरुणीच्या सासऱ्यांनी चुलत सासऱ्यांकडून घेतलेली 10 लाख रुपयांची रक्कम परत करण्यासाठी तरुणीच्या वडीलांकडून मागणी करुन तरुणीला मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. अखेर तरुणीने गत जानेवारी महिन्यामध्ये आपले माहेर गाठून खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी डॉक्टर व त्याच्या कुटुंबियांविरोधात फसवणुकिसह छळवणुकिचा गुन्हा दाखल केला आहे.








Be First to Comment