पंधरा दिवसात लावला चोरट्यांचा छडा
सिटी बेल । कर्जत । संजय गायकवाड ।
कर्जत मधून मेंढ्या, बोकड, बकरी असा सुमारे 60 हजार रुपये किमतीचा माल अज्ञात चोरट्यांनी पंधरा दिवसापूर्वी चोरून नेला होता, त्या चोरट्यांना पकडण्यात कर्जत पोलिसांना यश आले आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी दि. 14 मार्च 2021 रोजी रात्री 2 वाजण्याच्या सुमारास कर्जत भिसे गाव येथील जुने एसटी स्टॅन्ड येथे राहणारे दीपक दिगंबर धनगर यांच्या घराच्या बाजूला असलेल्या गोठ्यातून 11 मेंढया, बोकड, बकरी असा एकूण 60 हजार रुपये किमतीचा माल कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता, त्याबाबत दीपक धनगर यांनी कर्जत पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक 43/2021 भा.द.वि. कलम 380 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलिस उपनिरीक्षक सचिन गावडे आणि पोलीस अंमलदार भूषण चौधरी करीत होते.
गुन्ह्याच्या घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेरे तसेच शेडुंग फाटा टोलनाक्यावरील सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांनी तपासले असता गुन्हा करताना आरोपींनी फोर्ड कंपनीची आयकॉन मॉडेलचे वाहन क्रमांक 8552 चा वापर केला असल्याचं पोलिसांना तपासात निष्पन्न झाले, अर्धवट मिळालेल्या क्रमांकावरून पोलिसांनी नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटर पुणे यांची मदत घेऊन तसेच कौशल्य वापरून सदर वाहना पर्यंत पोहचून गुन्ह्यातील आरोपी सुंदरेश वरण गणेश मुदलियार उर्फ अण्णा राहणार सुभाष टेकडी उल्हासनगर,व अकील मोहम्मद अजिद कुरेशी राहणार कौसा, मुंब्रा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी मिळून सदरचा गुन्हा केल्याचे पोलिसांकडे कबूल केले.
आरोपींना चोरून नेलेल्या माला बाबत विचारना केली असता आरोपींचे मटन व्यवसायाचे दुकान असल्याने त्यांनी सदर चा माल कापून त्याचे मटन विकल्याचे तपासात कबूल केले. त्यातून मिळालेले 40 हजार रुपये रोख रक्कम तसेच गुन्हा करता वापरलेली 1 लाख रुपये किंमतीची फोर्ड कंपनीची आयकॉन कार गाडी क्रमांक (MH-06-W-8552) असा 1 लाख 40 हजार रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात कर्जत पोलिसांना यश आले आहे. सदर आरोपी यांनी धुळे, नाशिक येथे सुद्धा अशाच प्रकारचे गुन्हे केल्याचे तपासात कबूल केले असून त्याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत. रायगड पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, कर्जत उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल घेरडीकर पोलीस निरीक्षक अरुण भोर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलिस ठाणे गुन्हे प्रगटीकरण पथकातील पोलिस उपनिरीक्षक सचिन गावडे, पोलीस अंमलदार सुभाष पाटील, पोलीस अंमलदार भूषण चौधरी, पोलीस अमलदार अश्रुबा बेंद्रे यांनी चोरीचा तपास लावला.








Be First to Comment