देवाड्रील कंपनी आली “देवा” सारखी धावून
सिटी बेल लाइव्ह / महाड/प्रतिनिधी #
कोवीड 19 या विषाणूचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. मोठया शहरांमधून आता छोटया शहरांमध्येही हा विषाणू झपाटयाने वाढत चालला आहे. हा विषाणू रोखण्यासाठी संपूर्ण रायगड जिल्हयात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. रायगडमधील कोेरोना रुग्णांची वाढती संख्या चिंतेचा विषय ठरत चालली आहे. तसेच रायगडवासीयांसाठी कोवीड रुग्णालय नसल्याने त्यांना पनवेल किंवा मुंबई गाठावी लागत आहे. त्यामुळे या रुग्णांची परवड होते आणि हिच परवड रोखण्यासाठी महाड औद्योगिक क्षेत्रातील देवा ड्रील कंपनी देवासारखी धावून आली आहे. या कंपनीतर्फे महाडमध्ये 100 बेडसचे अद्ययावत कोवीड रुग्णालय जलद गतीने उभारण्यात येणार आहे. सदर कोवड रुग्णालय हे महाड एमआयडीसीमधील बंद असलेल्या के.एस.एफ. कॉलनीमध्ये उभारण्यात येणार असून यासाठी महाड मॅन्यूफॅक्चर असोसिएशनचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
कोणतेही संकट मानवी मर्यादेच्या पलिकडचे असल्यास आपण सर्वच देवाचा धावा करतो आणि देवाने रायगडवासीयांची हाक ऐकली आहे आणि महाड शहरात देवाड्रील कंपनीने 100 बेडसचे अद्ययावत कोवीड रुग्णालय उभारण्याची तयारी दर्शवली आहे ही महाडवासीय तसेच आजूबाजूच्या परिसरातील रुग्णांसाठी अतिशय आनंदाची बाब आहे. कोणताही व्यवसाय करताना नेहमीच फायद्याचे गणित पाहिले जाते. मात्र एखादे संकट जर देशावर, समाजावर आले असेल तर आपण कमवत असलेल्या काही हिस्सा हा जनकल्याणासाठी खर्च करावा हा उदात्त हेतू कंपनीने ठेवून सदर हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे.
कोवीड रुग्णामध्ये प्रामुख्याने ऑक्सीजनची कमी भासल्यास त्याच्या जीवाला धोका निर्माण होतो आणि अशा गंभीर रुग्णांसाठी काही बेडसला ऑक्सीजनची सुविधाही पुरविण्यात येणार आहे. कोवीड 19 हा विषाणू संपूर्णपणे नष्ट होवून पुन्हा जीवन पुर्वपदावर यावे अशीच कंपनीची इच्छा आहे. मात्र परिसरात जर दुर्देवाने या कोरोना विषाणूचा फैलाव जलदगतीने झाला तर त्या रुग्णांची परवड होवू नये यासाठी हे पाऊल उचलले असल्याचे कंपनीकउून सांगण्यात आले. परिसरातून या निर्णयाचे स्वागत होत असून लवकरात लवकर हे कोवीड रुग्णालय उभारले जावे अशी इच्छा व्यक्त करण्यात येत आहे.






Be First to Comment