शिवकर ग्राम पंचायतीचा अभिनव उपक्रम
पनवेल तालुक्यातील शिवकर ग्रामपंचायतीच्या कामगिरीचा आलेख सातत्याने चढता राहिला आहे.सरपंच अनिल ढवळे यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर ग्रामपंचायत हद्दीमध्ये अभूतपूर्व असे सकारात्मक बदल पाहायला मिळाले आहेत. सरपंच अनिल ढवळे यांच्या डोक्यातून आलेल्या भन्नाट कल्पनेमुळे ग्रामपंचायतीची करवसुली शंभर टक्के होणार तर आहेच शिवाय नागरिकांच्या घरात खरपूस पुरणपोळ्यांचा खमंग वास सुद्धा सुटणार आहे.
ग्रामपंचायत शिवकर येथील रहिवासीयांसाठी दि 15 मार्च पर्यंत आपल्या घराचे घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकीसह पूर्ण भरलेल्यांना होळी सणानिमित्त रवा, मैदा, साखर, गुळ व चणाडाळीचे मोफत वाटप 25 मार्च रोजी रा.जि.प शाळा, शिवकर मैदानावर संपन्न झाले. यावेळी पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते त्यांच्यासमवेत तहसीलदार विजय तळेकर, शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काशिनाथ पाटील,शेकाप चे पनवेल जिल्हा चिटणीस तथा नगरसेवक गणेश कडू, माजी सैनिक समीर दुंद्रेकर, सरपंच अनिल ढवळे, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
याबाबत अधिक माहिती देताना अनिल ढवळे असे म्हणाले की आम्ही 15 मार्च पर्यंत निकष लावलेला असला तरीदेखील होळीच्या आदल्या दिवशीपर्यंत जे थकबाकी सह घरपट्टी पाणीपट्टी भरतील त्या सगळ्यांना जिन्नस देण्याचा आमचा मानस आहे.
अनिल ढवळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शिवकर ग्रामपंचायतीमध्ये न भूतो न भविष्यती असे बदल पाहायला मिळाले. तालुका तसेच जिल्हास्तरीय आदर्श ग्राम पारितोषिक पटकावले यामुळे त्यांच्या शिरपेचामध्ये सन्मानाचे तुरे खोचले गेले आहेत. आमदार बाळाराम पाटील यांनी सदर ग्रामपंचायत दत्तक घेतली आहे.







Be First to Comment