सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू)
देशात व राज्यात कोरोना कोविड १९ या विषाणूंने हाहाःकार माजवला आहे. त्यामुळे जनता भयभीत झाली आहे. हिंदू समाजाचे आराध्य दैवत समजले जाणारा गणेशोत्सव सण आता महिन्यावर येऊन ठेपला असताना कोरोनाची भीती वाढतच चालली आहे. आज पासून सुरू झालेल्या श्रावण महिन्यातील सणांबरोबर गणेशोत्सवावरही कोरोनाचे गडद सावट असल्याने गणेशभक्तांत नाराजीचा सूर निघत आहे.
मार्च महिन्यापासून कोरोना कोविड १९ विषाणूने देशात व राज्यात हाहाःकार माजवला आहे. दररोज मोठ्या प्रमाणात कोरोना पॉजेटीव्ह आढळून येत आहेत. यातील कित्येकांचा बळी गेला आहे. कोरोनाचे सावट कमी होण्याऐवजी ते वाढतच चालले आहे. या विषाणूवर ठोस उपाययोजना करणारी औषधे सापडली नाहीत. तसेच गेली चार पाच महिन्यापासून त्याचा प्रादुर्भाव वाढत चालल्याचे चित्र पहावयास मिळते. त्यामुळे सर्वच ठप्प झाले आहे.
कोरोना प्रसार हा गर्दीच्या ठिकाणी होत आहे. यामुळे गर्दी असलेल्या ठिकाणी न जाता सोशल डिस्टंट पाळणे गरजेचे आहे. ते न पाळले जात असल्यामुळेच कोरोना वाढत चालला आहे. याचा प्रत्यय काल साजरा झालेल्या गटारी या दिवशी दिसून आला. त्यात आता हिंदू धर्माच्या नव्य सणांना आता म्हणजे श्रावण महिन्यातील नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोपाळकाला, नागपंची अशा अनेक सणांबरोबर महिनाभरात लाडक्या गणरायाचे आगमन होणार आहे. यावेळीही नियमांचे उल्लंघन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लाडक्या गणेशोत्सवात तर प्रत्येक घरोघरी गणरायाचे आगमन होत असते. यावेळी घर भरलेले असते. त्याचबरोबर गणरायाचे दर्शन घेण्यासाठी नातेवाईक व मित्रमंडळी येत असतात. त्यावेळी सोशल डिस्टंटचे कोणी पालन करेल असे वाटत नाही. याचे परिणाम कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यात होऊ शकतो.
हिंदू समाजाचे श्रावण महिन्यातील सण व गणेशोत्सव हे प्रमुख सण मानले जात आहेत. लाडक्या गणरायाचे आगमन आता बरोबर महिनाभरात होणार आहे. त्याची तयारी आतापासूनच सुरू होते. परंतु कोरोनाचे संकट आणखीनच गडद झाल्याने गणेशभक्त चिंतेत सापडला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून अनेक उत्सवावर पाणी सोडावे लागले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेला तर मात्र गणेशोत्सव ही सण साजरा होईल की नाही असा सवाल गणेश भक्तांना सतावीत आहे.







Be First to Comment