Press "Enter" to skip to content

रोहा तालुका जेष्ठ नागरिक संघाची मागणी

कोविड-१९ लसीकरण मोहीम जेष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र कँम्पची व्यवस्था करावी

सिटी बेल लाइव्ह । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे ।

कोविड-१९ लसिकरण मोहिमेतंर्गत जेष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र कँम्पची व्यवस्था करावी अशाप्रकारची मागणी रोहे तालुका जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पी.बी.सरफले यांनी ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय रोहा आरोग्य अधिकारी डॉ. खैरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे संघटनेचे वतीने केली आहे.

कोविड-१९ या विषाणूचा प्रादुर्भाव सर्वत्र मोठ्या प्रमाणावर वाढत चालला असल्याने गेल्या वर्षभरापासून जनजीवन विस्कळीत झाले आहे.लहानांपासून जेष्ठांपर्यन्त सर्वचजण भितीचे सावटाखाली जगत आहेत.अशा भयंकर आपत्तीत देखील आरोग्य यंत्रणेने आपले कर्तव्य चोखपणे बजावत कर्तव्यात कसूर न केल्याने जेष्ठांचे जीवन सुरक्षित राहिले असल्याची भावना निवेदनात स्पष्ट करून विशेष आभार व अभिनंदनही व्यक्त केले आहेत.

शासकीय धोरणानुसार कोरोना महामारीला प्रतिबंध करण्यासाठी सर्वत्र लसीकरण मोहीम राबविण्यात येऊ लागली आहे.यामध्ये जेष्ठ नागरिकांना लसीकरणाबाबत विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.सर्वच जेष्ठ नागरिकांना मोबाईल वापराचे ज्ञान नसल्याने अँपचा वापर करून लसीकरणासाठी त्यांच्या नावाची नोंदणी करणे शक्य होत नाही. त्यामुळे याबाबत त्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

सध्याच्या वातावरणात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचे काम व्यवस्थितरित्या व चांगल्या पद्धतीने चालले आहे.अशी प्रतिक्रिया जनसामान्यांतून येत आहे.याचे सारे श्रेय आरोग्य यंत्रणेला नक्कीच द्यायला हवे अशाप्रकारची प्रतिक्रिया शेवटी निवेदनात त्यांनी दिली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.