सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू ।
चाणजे ग्रामपंचायतीच्या सभागृहाला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व माजी सरपंच स्वर्गवासी रमेशशेठ डाऊर यांचे नाव देण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य व्यंकटेश म्हात्रे यांनी चाणजे सरपंच मंगेश थळी यांच्याकडे केली आहे.
स्वर्गवासी रमेशशेठ डाऊर हे सरपंच असताना त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयासाठी जागा मिळण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यावेळी न्यायालयीन लढाई लढावी लागली. त्यासाठी आपल्या कुटुंबाला न्यायालयाची पायरी चढावी लागली होती. पाच ते सहा वर्ष न्यायालयीन लढाई लढावी लागली. रमेशशेठ डाऊर यांची जिल्हापरिषद अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर निकाल ग्रामपंचायतीच्या बाजूने लागला.
सिडकोने ही ९९ वर्षाच्या लिजवर ग्रामपंचायतीला दिली. त्यानंतर ग्रामपंचायतीचे सुसज्ज कार्यालय रमेशशेठ डाऊर यांनी उभारत त्याचे उदघाटन त्यावेळचे मुख्यमंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी शरद पवार यांनी डाऊर यांच्या कार्याचा गौरव करून सदर कार्यालय ग्रामपंचायतीचे नाही तर जिल्हा परिषदेचे कार्यालय असल्याचा भास होत असल्याचे त्यांनी सांगितले.
सुसज्ज ग्रामपंचायतीचे कार्यालय व मोठे मैदान हे स्वर्गवासी रमेशशेठ डाऊर यांच्यामुळे मिळाले असतानाही आज त्यांच्या जाण्याने चाणजे बरोबर उरणच्या जनतेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र याचा विसर उरण व चाणजे ग्रामपंचायतीच्या जनतेला, राजकीय पदाधिकाऱ्यांना व ग्रामपंचायतीला झाल्याचे दिसत आहे.
उशिरा का होईना चाणजे ग्रामपंचायतीचे सदस्य व्यंकटेश रामचंद्र म्हात्रे यांनी ग्रामपंचायत सभागृहाला माजी जिल्हापरिषद अध्यक्ष व २५ वर्षे सरपंच पद भूषविणारे स्वर्गीय रमेशशेठ डाऊर यांचे नाव देण्याची मागणी सरपंचप मंगेश थळी यांच्याकडे केली आहे.
ही मागणी कधी पूर्णत्वास जाते याकडे चाणजे ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.








Be First to Comment