शिवसेना तालुका प्रमूख समीर शेडगे
यांचा इशारा
सिटी बेल लाइव्ह । धाटाव । शशिकांत मोरे ।
रोहा अष्टमी नगरपरिषदेत गेल्या पाच वर्षात भरपूर कामे मंजूर झाली मात्र ही कामे करत असताना अनधिकृतपणे केली असल्याचा आरोप रोहा तालुका शिवसेना तालुका प्रमूख समीर शेडगे यांनी केला आहे. यातील भुयारी गटाराच्या योजनेचे ३६ कोटी रुपये फुकट गेले, नदीसंवर्धंन काम अपूर्ण असल्याने कम्पलेशन सर्टिफिकेट नसतानाही लोकार्पंन करुन नागरिकांकडून तिकीट वसूल करण्याचे काम केले जात आहे. नैसर्गिक गटारांवर अनधिकृतपणे स्ल्याब टाकण्यात आले आहेत.
रोह्यातील या अनधिकृत कामांविरोधात शिवसेना उग्र आंदोलन करणार असे मत रोहा तालुका प्रमूख समीर शेडगे यांनी व्यक्त केले. आज बुधवार १७ मार्च रोजी रोह्यातील शासकीय विश्राम गृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी नगरसेविका समीक्षा बामणे, माजी नगरसेवक दिपक तेंडुलकर, उस्मान रोहेकर, राजेश काफरे, आदित्य कोंडाळकर, विभाग प्रमूख संदीप सुतार, निता हजारे उपस्थीत होते.
यापुढे बोलताना ते पुढे म्हणाले की, विमलाबाई मेहंदळे हायस्कूल मुलींच्या शाळेच्या ठिकाणी खाजगी संस्थेला इंग्रजी शाळा भाडेतत्वावर चालविण्यासाठी इमारत दिली. असे करायचे होते तर भाडेतत्वावर देण्याआधी नगरपालिकेने ४ ते ५ लाख रुपये डागडुजीसाठी खर्च का केले असा सवाल केला. याबाबत शिवसेनेच्या एकमेव नगरसेवक समीक्षा बामणे यांनी नगरपरिषदच्या सभेत आवाज उठविला असता त्यांच्या विरोधात अनधिकृत कामे केल्याच्या आरोपावरून त्यांना नगरसेवक पदावरुन खाली करण्याचा राजकीय कट करण्यात आला. भुयारी गटार योजनेत सरकारचे ३६ कोटी रुपये फुकट गेले असल्याचे त्यांनी सांगितले.
भुयारी गटाराचे काम अर्धवट ठेवल्याने वाढत्या लोकसंखेमुले पुढच्या पिढीला याचा त्रास सहन करावा लागणार आहे. नदीसंवर्धनाचे काम अपूर्ण असताना लोकार्पण करण्यात आले असून कामही अपूर्ण ठेवण्यात आले असल्याने शासनाची फसवणूक करण्यात आली आहे.
आगामी काळात रोहा अष्टमी नगरपरिषदेची निवडणूक शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचे मत तालुका प्रमूख समीर शेडगे यांनी व्यक्त केले. याशिवाय राष्ट्रवादी वगळून मित्रपक्षाचे मत विचारात घेणार असल्याचे सांगितले. केवळ स्थानिकांच्या प्रश्न सोडविण्यासाठी लोक निवडून देतील असे शेवटी म्हणाले.
पत्रकार परिषदेत उस्मान रोहेकर, समीक्षा बामणे व दीपक तेंडुलकर यांनी रोहा शहरात होणा-या अनधिकृत कामांविषयी आपले मत व्यक्त केले.








Be First to Comment