रिलायन्स कंपनीच्या नागोठण्यातील नियोजित कोविड केअर सेंटरची आ. अनिकेत तटकरे यांनी केली पाहणी
सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) :
रिलायन्स इंडस्ट्रीज लि. या कंपनीतील कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांमुळे नागोठणे परिसरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता खा. सुनिल तटकरे यांनी रिलायन्स कंपनीच्या व्यवस्थापनाला दिलेल्या आदेशानुसार नागोठण्यातील नियोजित कोविड सेंटरची पाहणी विधानपरिषदेचे आमदार अनिकेत तटकरे यांच्याकडून करण्यात आली. नागोठणे विभागातील दहा ग्रामपंचायतीच्या अंतर्गत असलेल्या सुमारे ४० गावांतील नागरिकांसाठी १० खोल्यांसह ५० खाटांचे हे कोविड केअर सेंटर येत्या काही दिवसात रिलायन्स कंपनीकडून तीन महिन्यांच्या भाडे तत्वावर घेण्यात आलेल्या भाएसोच्या वेलशेत येथील विद्यासंकुलातील एस.डी. परमार इंग्लिश मिडीयम स्कूलच्या इमारतीत सुरु होणार आहे.
रिलायन्स कंपनीच्या कोरोना रुग्णांमुळे नागोठणे परिसरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याची तक्रार करुन कंपनीने त्यांच्या कामगांरा व्यतिरिक्त इतर रुग्णांचीही काळजी घेतली पाहिजे अशी मागणी नागोठणे विभागातील सरपंच व नेते मंडळींनी खासदार सुनिल तटकरे यांच्याकडे केली होती. त्या तक्रारीची तत्काळ दखल घेऊन खासदार तटकरे यांनी नागोठणे विभागातील इतर रुग्णांचीही काळजी घ्या असा आदेश रिलायन्स कंपनीच्या व्यवस्थापनास काही दिवसांपूर्वीच रोहा येथील बैठकीत दिला होता. त्यानुसार खा. सुनिल तटकरे यांच्या आदेशाचे पालन करून रिलायन्स व्यवस्थापन भाएसोची एस. डी. परमार स्कुलची इमारत तीन महिन्यांसाठी भाडे तत्वावर घेऊन (रिलायन्स कंपनीचे इस्टेट मॅनेजर अजिंक्य पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार) त्या इमारतीत पाॅझिटिव्ह परंतु सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचारासाठी हे कोविड केअर सेंटर सुरू करणार आहेत.
नागोठण्यातील या नियोजित कोविड केअर सेंटरची पाहणी सोमवार दि. २० जुलै रोजी दुपारी तीन वाजता आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी करून संबंधित अधिकारी वर्गाला कोरोना रुग्णांची काळजी संदर्भात आवश्यक त्या सर्व सूचना केल्या. यावेळी आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे विभागीय नेते भाई टके, रोहा प्रांताधिकारी डॉ. यशवंतराव माने, रोहा गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, नागोठणे रिलायन्स कंपनीचे इस्टेट मॅनेजर अजिंक्य पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुधाकर जवके,राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष उदय जवके, पिगोंडे सरपंच संतोषभाई कोळी, कडसुरे सरपंच राजेंद्र शिंदे, युवक राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस विनय गोळे, राष्ट्वादीच्या पेण तालुका महिला उपाध्यक्षा सौ. वरुणा प्रमोद तरे, झोतिरपाडा सरपंच सौ. ज्योती दत्ताराम तरे, दिपेंद्र अवाद, पाटणसई ग्रामपंचायतीचे सदस्य सचिन कळसकर, नागोठणे ग्रामपंचायतीचे सदस्य अतुल काळे, अकलाख पानसरे, युवक राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष रोशन पारंगे, युवक राष्ट्रवादी नागोठणे शहर अध्यक्ष दिनेश घाग, दत्ताराम तरे, राष्ट्वादी विद्यार्थी संघटनेचे केतन भोय आदी उपस्थित होते. यावेळी कोविड केअर सेंटर संदर्भात आ. अनिकेतभाई तटकरे यांना माहिती देताना प्रांताधिकारी डॉ. यशवंतराव माने म्हणाले की, या कोविड सेंटरमधील परमार स्कुलच्या इमारतीतील १० खोल्यांत ३५ पुरुष व १५ महिलांसाठी अशी ५० बेडची व्यवस्था करण्यात येणार असून सर्वांची जेवणाची व औषाधोपचार करण्याची सोय रिलायन्स व्यवस्थापन करणार आहे. तसेच येत्या दोन दिवसांत कोरोना प्रादुर्भाव रोखण्या संदर्भात नागोठणे विभागातील सर्व सरपंचांची बैठक नागोठणे ग्रामपंचायत सभागृहात घेणार असल्याचे डाॅ. माने तांनी सांगितले. दरम्यान कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्व नागरिकांची थर्मल स्किनींग तपासणी करण्यासाठी नागोठणे विभागातील सर्व ग्रामपंचायतींना आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या सहकार्याने टेंपरेचर मीटर गन, आॅक्सी मीटर, हँड ग्लोवज् आदी वस्तूंचा समावेश असलेले कीट देण्यात येणार असल्याचेही यावेळी आ. अनिकेत तटकरे यांनी सांगितले.






Be First to Comment