चिरीमिरी देवून धंदेवाल्यांना येणाऱ्या कमी बिलाच्या घोटाळ्याचे काय ? उरणकरांचा सवाल
सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू ।
कोरोनाच्या काळानंतर विजेची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली असून ती जवळपास १५ कोटी पर्यंत पोहचली असून ती थकबाकी लवकरात लवकर भरून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन उरणचे उपकार्यकारी अभियंता हरिदास चोंडे यांनी केले आहे.
कोरोनाच्या महामारीमुळे सर्वच ठप्प झाले होते. त्यामुळे विजेचे बिल ही भरण्यात आले नव्हते. आज जवळपास वर्षांचा अवधी होऊन ही कोरोनाचे संकट दूर होताना दिसत नाही. यामुळे वीज बिलांचा आकडाही फुगत चालला होता. कोरोना काळातील वीज बिल माफ होतील असा विश्वास वीज ग्राहकांना वाटत होता. परंतु हा विश्वास पूर्णपणे फोल ठरला असून थकबाकीदारांनी वीज बिल भरली नसतील तर त्यांची वीज कनेक्शन कट करण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे वीज ग्राहकांत खळबळ माजली आहे.
आजच्या घडीला उरण तालुक्यातील ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या रस्त्यावरील वीज कनेक्शनची थकबाकी जवळपास ८ कोटीच्या वर गेल्याने ती कनेक्शन कट करण्यात आली आहेत. ग्रामपंचायत पाणी कनेक्शन वीज बिल ७० लाखाच्या आसपास आहेत. त्याचप्रमाणे घरगुती वापरातील वीज कनेक्शनचे बिले ही ७ कोटीच्या आसपास आहेत. अशा प्रकारे उरण तालुक्यातील आजच्या घडीला वीज बिलाची थकबाकी १५ कोटीच्या वरती असल्याची माहिती उरणच्या उपकार्यकारी अभियंता हरिदास चोंडे यांनी देत वीज बिलाची थकबाकी लवकरात लवकर भरण्याचे आवाहनही चोंडे यांनी उरणच्या आम जनतेला केले आहे.
या संदर्भात आज उरण पंचायत समितीमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी यावर वादळी चर्चा होऊन वीज बिल टप्प्याटप्प्याने भरण्याचे ग्रामपंचायतीने मान्य केले असल्याचे समजते. उरणमधील थकबाकीदारांची वीज कनेक्शन कट करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेकांनी वीज बिल भरण्यास सुरुवात केली आहे. तर काहींना टप्प्याटप्प्याने भरण्याची सवलत दिली असल्याची माहिती अधिकारी चोंडे यांनी दिली.
दरम्यान उरणमधील बार, हॉटेल, इलेक्ट्रॉनिक व इतर दुकाने, मोठमोठे उद्योग धंदेवाले यांच्यातील काहींची विजेची बिले ही वापरापेक्षा कमी असल्याचे दिसून येते. तर काहींना वायरमनच सहकार्य करून विज कनेक्शन मीटर मधून कट करून डायरेक्ट करून पुन्हा जैसे थे करून देत असल्याने त्यांना वीज बिल वापरापेक्षा कमी येत आहेत. तरी याचीही चौकशी केली तर नक्कीच उरणचा वीज चोरीचा महाघोटाळा नक्कीच उघड होईल अशी चर्चा उरणच्या जनतेत सुरू आहे.








Be First to Comment