दोन वर्षांच्या मितालीचे अपहरण करणाऱ्या महिलेस ५ तासात अटक
पोलीसांच्या कर्तव्यदक्षतेला सिटी बेल चा सलाम
सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू ।
उरण तालुक्यातील नवघर गावातील अवघ्या २ वर्षीय मितालीचे अज्ञात महिलेने अपहरण केले होते. उरण पोलिसांनी त्वरित यशस्वी तपास यंत्रणा राबविल्याने काही तासाच्या अवधीत अपहरण करणाऱ्या महिलेला अवघ्या ५ तासातअटक करण्यात उरण पोलिसांना यश आले आहे. पोलिसांच्या या यशस्वी कामगिरीबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
नवघर गावात राहणाऱ्या मनोज राजभर यांच्या अवघ्या २ महिन्याच्या बालिकेला अज्ञात महिलेने डोस देण्याच्या बाहण्याने पळवून नेली. याबाबत उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र बुधवंत यांनी या घटनेची माहिती पोलीस उपआयुक्त पनवेलचे शिवराज पाटील, सहा पोलीस आयुक्त पोर्ट विभागाचे सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू केला. घटनास्थळी जाऊन घटनेची माहीती घेऊन सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितगीरा कडून मिळालेल्या माहितीनुसार सीसीटीव्हीमध्ये दिसत असलेल्या रिक्षाचा पोलिसांच्या ३ पथकाच्या वतीने सुरू होता.


द्रोणागिरी परिसरात रिक्षाचा शोध घेत असताना सदर वर्णनाची रिक्षा सापडली. त्यावेळी रिक्षा चालकाकडे चौकशी केली असताना नवघर गावातून महिलेला व मुलाला दास्तान फाटा येथे सोडल्याची माहिती दिली. त्यानंतर दास्तान फाटा येथील रिक्षा चालकांकडे चौकशी केली असता सदर महिला रिक्षाने पनवेल मधील गुणे हॉस्पिटलमध्ये गेल्याचे समजले. यानंतर गुणे हॉस्पिटल येथे जाऊन तेथील सीसीटीव्ही फुटेज लहान मुलासह दिसून आली. पनवेल भाजी मंडई येथील रिक्षा चालकांकडे पोलीस पथकाने आरोपी महिला व मुलाची विचारपूस केली असता एका रिक्षा चालकाने महिला व मुलाला खांदा कॉलनी येथील कृष्णा हॉस्पिटलला सोडल्याची माहिती दिली. पोलिसांच्या पथकाने त्वरित कृष्णा हॉस्पिटल गाठले असता त्यांना आरोपी महिला मुलासह आढळली. पोलिसांनी महिलेस ताब्यात घेत मुलीस आईवडिलांकडे सोपविली.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपआयुक्त पनवेलचे शिवाजीराव पाटील, पोर्ट विभागाचे सहा पोलीस आयुक्त सचिन सावंत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र बुधवंत, सहा पोलीस निरीक्षक तुकाराम निंबाळकर, सहा पोलीस निरीक्षक शिवाजी होनमाने, राजू पठाण व इतर सहकारी यांनी यशस्वीपणे तपास केला. तसेच वरिष्ठांच्या आदेशाने पनवेल शहर पोलीस ठाण्याचे अजय लांडगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक व गुन्हे प्रकटीकरण पथक, न्हावा शेवा व तळोजा पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे अधिकारी व अंमलदार यांनी सुद्धा सहकार्य केले.
सदर गुन्ह्यातील आरोपी महिला व लहान मूल यांना अवघ्या ५ तासात पकडून मूल आई वडिलांच्याकडे सुपूर्द करण्यात उरण पोलिसांना यश आले. पोलीसांच्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. पुढील तपास सुरू आहे.








Be First to Comment