Press "Enter" to skip to content

प्रकल्पग्रस्तांचे BPCL गेटसमोर बेमुदत धरणे उपोषण सुरू

भारत पेट्रोलियम प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती भेंडखळ च्या उपोषणाला उरण मधील विविध सामाजिक संस्थांनी दिला जाहीर पाठिंबा

सिटी बेल लाइव्ह । उरण । विठ्ठल ममताबादे ।

भेंडखळ गावातील उर्वरित BPCL प्रकल्पग्रस्तांना त्वरीत नोकरीत सामावून घ्यावे. नोकरी मिळे पर्यंत प्रकल्पग्रस्तांना 20,000 रुपये निर्वाह भत्ता चालू करणे, अपंग व्यक्तींच्या वारसांना त्वरीत नोकरीत सामावून घ्यावे या प्रमुख मागणीसाठी भारत पेट्रोलियम प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती भेंडखळ तर्फे BPCL भेंडखळ कंपनी गेट समोर बेमुदत धरणे उपोषणाला सुरवात झाली आहे.

उरण तालुक्यातील भेंडखळ ग्रामपंचायत हद्दीत भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL )ही केंद्र सरकार पुरस्कृत कंपनी कार्यरत असून BPCL ने या प्रकल्पासाठी भेंडखळ गावातील 207 एकर जमीन संपादित केली. त्याबदल्यात प्रकल्पग्रस्तांना नोकरीं व इतर आश्वासने देण्यात आली. मात्र BPCL प्रशासनाने ते आश्वासन पूर्ण केले नाही. आता तर मात्र या कंपनीत परप्रांतीय कर्मचाऱ्यांचा खूप मोठा भरणा आहे. स्थानिकांना मात्र नोकर भरती पासून वगळले जाते. बेरोजगार प्रकल्पग्रस्तांनी कंपनी प्रशासनाशी अनेकवेळा पत्रव्यवहार केला पण BPCL कंपनी प्रशासनाकडून कोणतेही योग्य असा प्रतिसाद मिळाला नाही. भेंडखळ गावातील बेरोजगार प्रकल्पग्रस्त तरुणांना या कंपनीने कामावर रुजू करून घेण्यास विरोध दर्शविल्याने या कंपनीच्या मनमानी कारभाराचा निषेध करण्यासाठी व विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी भारत पेट्रोलियम प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती भेंडखळचे अध्यक्ष अनिल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली BPCL गेटसमोर फिजिकल, सोशल डिस्टन्स पाळून, मास्क व सॅनिटायझरचा वापर करून बेमुदत उपोषणाला सुरवात झाली असून या उपोषणाचा आज दि 15/3/2021 रोजी पहिला दिवस आहे.

या बेमुदत धरणे उपोषणाला उरण मधील विविध सामाजिक संस्थांनी जाहीर पाठिंबा दिला असून या उपोषण स्थळी भाग्यश्री चव्हाण-सरपंच, लक्ष्मण ठाकूर -उपसरपंच, संध्या ठाकूर -माजी सरपंच,संतोष पवार -सरचिटणीस उरण सामाजिक संस्था यांच्यासह भेंडखळ ग्रामपंचायतचे सदस्य, जेष्ठ नागरिक उपस्थित होते.विविध क्षेत्रातील मान्यवरांनी यास्थळी भेट देऊन आपला पाठिंबा दिला.

जोपर्यंत प्रकल्पग्रस्तांच्या, संघर्ष समितीचे मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हे बेमुदत धरणे उपोषण असेच सुरु राहणार असल्याचे सांगत उद्या कोणाचे बरेवाईट झाल्यास त्याला BPCL कंपनी प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील असे भारत पेट्रोलियम प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष अनिल ठाकूर यांनी BPCL कंपनी प्रशासनाला ठणकावून सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.