कोरोना बळींची संख्या पाच, काटेतळी येथे एक कोरोना रूग्ण
सिटी बेल लाइव्ह / पोलादपूर (शैलेश पालकर)
तालुक्यातील देवपूर व तुर्भे बुद्रुक येथे प्रत्येकी एक कोरोनाबळी झाल्याची माहिती सरकारी सुत्रांनी दिल्याने बळींची संख्या पाच झाली असून काटेतळी येथे आणखी एक कोरोना रूग्ण आढळून आल्याने बळींसह बाधित रूग्णांची संख्या 53 वर पोहोचली असल्याची माहितीही यावेळी तालुका प्रशासनाकडून देण्यात आली.
पोलादपूर तालुक्यातील तुर्भे बुद्रूक येथील बबन महामुनी या प्रौढाने मुलीचे पुणे येथे दि.28 जुनरोजी लग्न लावल्यानंतर गावी परत आल्यावर आठच दिवसांत त्याच्यामध्ये लक्षण दिसून आली. त्याच्यावर उपचार सुरू असतानाच 14 जुलैरोजी मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली. यानंतर देवपूर येथील मंगेश महाडीक या 68 वर्षीय बायपास सर्जरी झालेल्या वृध्दाचा मृत्यू 18 जुलैरोजी सकाळी झाला. यापुर्वी पोलादपूर प्रभातनगर, काटेतळी आणि माटवण येथे तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. काटेतळी येथे एका रूग्णाचा कोविड-19 टेस्ट रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने आधीच्या अर्धशतकी कोरोना रूग्णसंख्येत दोन मृतांसह एक रूग्णाची वाढ होऊन ही कोरोना रूग्णसंख्या 53 वर पोहोचली आहे. यापैकी 41 रूग्ण बरे होऊन घरी परतले असून 7 रूग्ण अद्याप उपचार घेत आहेत. पोलादपूर तालुक्यातील राजिप सदस्य चंद्रकांत कळंबे हे एकमेव रूग्ण 18जुलैरोजी उपचार घेऊन परतले आहेत.
दरम्यान, सोमवारी कोरोना संसर्गित क्षेत्रातील बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब कलेक्शन करण्यात आले असून याबाबत अहवाल प्राप्त झाल्यानंतर अधिक माहिती उपलब्ध होईल, असे यावेळी आयुषचे डॉ.राजेश शिंदे यांनी सांगितले.






Be First to Comment