Press "Enter" to skip to content

माथेरान पालिकेतील काँग्रेसचे नगरसेवक शिवाजी शिंदेंचे सदस्यत्व रद्द

आपल्याच राहत्या घरावर गरजेनुसार केलेले अतिरिक्त बांधकाम भोवले

शिवाजी शिंदेंचे सदस्यत्व रद्द झाल्याचा फायदा नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेला होणार ?

सिटी बेल लाइव्ह । माथेरान । मुकुंद रांजाणे ।

आपल्याच राहत्या घरावर गरजेनुसार केलेल्या अतिरिक्त बांधकाम प्रकरणी नगरसेवक शिवाजी शिंदेंच्या सदस्यत्वावर गंडांतर आले असून जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत दाखल करण्यात आलेल्या तक्रारी अर्जानुसार शिंदेंनी केलेले वाढीव बांधकाम हे अनधिकृत असल्याचे नगरपरिषदेच्या मार्फत सिद्ध झाले होते त्यामुळे जिल्हाधिकारी रायगड यांनी शिवाजी शिंदेंना अपात्र ठरवून त्यांचे नगरपरिषदेतील सदस्यत्व रद्द केले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,नगरपरिषदेत शिवसेनेची एकहाती सत्ता स्थापन झाली असून त्यावेळी विरोधी पक्षाचे अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नगरसेविका आणि काँग्रेसचा एकमेव नगरसेवक सन २०१६ च्या निवडणुकीत निवडून आले होते.परंतु नगरपरिषदेच्या कामकाजात सत्ताधारी गटाच्या काही त्रुटी निदर्शनास आल्यास ठाम विरोधाची भूमिका घेण्याची जबाबदारी एकट्या शिवाजी शिंदेंनी कुठल्याही प्रकारच्या आमिषाला बळी न पडता इमानेइतबारे निभावली होती.

दोन वर्षांपूर्वी नगरपरिषदेच्या सभागृहात सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे एकमेव सदस्य असलेले काँग्रेसचे शिवाजी शिंदे आणि सत्ताधारी गटातील प्रमुख नेत्यांसोबत शिंदेंची काही विषयावरून शाब्दिक चकमक उडाली होती त्यावेळेस शिवसेनेचे सक्रीय कार्यकर्ते सिताराम शिंदे यांनी या शाब्दिक बाचाबाची मध्ये हस्तक्षेप केला होता त्यावेळेस शिवाजी शिंदेंनी त्यास सक्त ताकीद दिली होती की, पक्षाचे दोन वरिष्ठ बोलत असताना तू मध्ये तोंड उघडू नकोस यावरून त्यांच्यात हमरातुमरी झाली होती. याचा राग मनात ठेवून सिताराम शिंदेंनी नगरसेवक शिवाजी शिंदेंच्या अतिरिक्त बांधकामा बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात त्याचे सदस्यत्व रद्द करण्याबाबत सन २०१९ मध्ये तक्रारी अर्ज सादर केला होता.

त्यावेळी शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांनी सिताराम शिंदेंना ही टोकाची भूमिका घेऊ नये म्हणून अनेकदा विनंती केली होती.परंतु त्यास कुठल्याही प्रकारचा सिताराम यांनी दुजोरा दिला नाही. आणि आपल्या निर्णयावर ठाम राहूूून तक्रारी अर्ज जिल्हाधिकारी यांंच्याकडे सुपूर्द केला होता.

जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाकडून दि.३ मार्च २०२१ रोजी अतिरिक्त वाढीव बांधकामा प्रकरणी शिवाजी शिंदेंचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.आपल्या प्रखर वक्तृत्वाने शिवाजी शिंदेंनी सभागृहात विरोधी पक्षाची भूमिका उत्तम प्रकारे पार पाडली होती. काँग्रेस पक्षाचा एक बुलंद आवाज आणि धगधगता ज्वलंत निखारा म्हणून तालुक्यात त्यांच्या नावाची चर्चा होती. माथेरान हे निम्म्याहून अधिक प्रमाणात बांधकामा बाबतीत अनधिकृत असताना याची झळ एकट्या शिवाजी शिंदेंना नगरसेवक या राजकीय पदामुळे सोसावी लागली आहे.त्यांचे सदस्यत्व रद्द झाल्यामुळे सोशल मीडियावर निरनिराळ्या प्रकारच्या चर्चेला उधाण आले आहे.

त्यामुळे आगामी नगरपरिषदेच्या डिसेंबर २०२१ च्या निवडणुकी मध्ये शिवाजी शिंदें सारखा लढवय्या विरोधक कदाचित सभागृहात नसणार याचा लाभ शिवसेनेला होणार की अजून काही राजकीय समीकरणे आणि घडामोडी घडणार आहेत याकडे आता समस्त माथेरान करांचे लक्ष लागले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.