पूर्वसंध्येला राबविली ग्राम स्वच्छता मोहिम
सिटी बेल लाइव्ह । रोहा । रविना मालुसरे ।
दरवर्षी ८ मार्च जागतिक महिला दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. जागतिक महिला दिना निमित्ताने महिलांच्या सन्मानाचे अनेक कार्यक्रम सर्वत्र आयोजित केले जातात. मात्र या उपक्रमांव्यतिरिक्तही आपण आपल्या गावची स्वच्छता करून हा दिन अधिक चांगल्या पद्धतीने साजरा करू शकतो, असा सर्जनशील विचार मालसईच्या युवतींच्या मनात आला. आपण समाजोपयोगी काही करावे या भावनेतून सदोदित संघटितरित्या काही कल्पक कार्यक्रम राबविणाऱ्या, मालसईच्या युवतींनी जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला ग्राम स्वच्छता मोहिमेची अंमलबजावणी केली.
गावाकडून पुरातन व जागृत महादेव मंदिराकडे जाणारी दुर्लक्षित पायवाट ही यानिमित्ताने स्वच्छ करून घेतली. लवकरच महाशिवरात्री निमित्ताने अनेक भाविक ह्याच पायवाटेने श्री महादेवाच्या दर्शनासाठी येणार, त्यांचा मार्ग सुकर व्हावा हा यामागचा हेतू.
मालसईच्या या युवतींनी राबविलेला हा ग्रामस्वच्छतेचा उपक्रम म्हणजे संवेदनक्षमतेचे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल . जागतिक महिलादिना निमित्ताने मालसईच्या युवतींनी राबवलेल्या ह्या स्वच्छता मोहिमेबद्दल ग्रामस्थ व परिसरांतील नागरिकांनी युवतींचे कौतुक केले आहे.








Be First to Comment